Devendra Fadnavis : मंत्रालयातील बोगस नोकरभरती रॅकेट प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली. लिपिक पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून 12 बेरोजगार तरुणांना फसवल्याचे प्रकरण समोर आले आहे. चार जणांच्या टोळीनं ही फसवणूक केली आहे. वेगवेगळी कारणं पुढे करून या बेरोजगार तरुणांकडून 74 लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.


12 बेरोजगार तरुणांकडून 74 लाख रुपयांची  वसुली 


वेगवेगळी कारणे पुढे देऊन 12 बेरोजगार तरुणांकडून 74 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्वांची मुलाखत मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात घेण्यात आली आहे. यासाठी लागणारी वैद्यकीय तपासणी जे. जे. रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यावर अधिष्ठाता यांच्या सह्यादेखील करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देकील देण्यात आली आहे. 


मालाड इथे राहणाऱ्या एका तरुणाची ओळख महेंद्र सकपाळ नावाच्या व्यक्तीसोबत झाली. हा तरुण स्वतःसाठी आणि त्याच्या दोन भावंडांसाठी नोकरीच्या शोधात असल्याचे सकपाळ यांना समजले. त्यांनी आपल्या परिचयातील नितीन साठे हे सामान्य प्रशासन विभागात सचिवपदावर कार्यरत असल्याचे सांगितले. सामान्य प्रशासन विभागात लिपिक पदासाठी भरती सुरू असून साठे यांना सांगून नोकरीसाठी प्रयत्न करता येईल, असे या तरुणाला सांगितले. बेरोजगार असल्यानं या तरुणाने स्वतःसाठी आणि दोन भावंडांसाठी पैसे खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सुरुवातीला नऊ लाख रुपये सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले. छायाचित्र, आधारकार्ड, तसेच इतर सर्व कागदपत्रे या तिघांनी सकपाळ यांच्याकडे दिली. त्यानुसार सकपाळ यांनी या तिघांना मंत्रालयात मुलाखतीसाठी यावे लागेल आणि वैद्यकीय तपासणी जे. जे. रुग्णालयात केली जाईल, असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. 


दरम्यान, मंत्रालयातील बोगस नोकरभरती रॅकेटप्रकरणी किती जण सहभागी आहेत. मंत्रालयातील आणखी किती कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच मुलाखती दरम्यान कुणाच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला, कुणाच्या वरदहस्तामुळं हे रॅकेट सुरू होते, अशा विविध प्रश्नांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये आता कोण कोण दोषी असणार हे समोर येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Recruitment Scam : आरोग्य विभागात नोकरभरतीचा महाघोटाळा, बोगस नियुक्तीपत्र देऊन नांदेडसह राज्यभरात अनेकांची फसवणूक