नागपूर : भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोना महामारीत गेला आहे. त्यामुळे विकास दर घटला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अजूनही जीएसटीचे 35 हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते ते येत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. निधीअभावी अनेक कामांना कात्री लावावी लागली. अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला. पण, आता कोरोना हळूहळू कमी होतोय. पुण्यात काल एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्या आधी मुख्यमंत्री येऊन गेले. प्राणी संग्रहालयाच्या कार्यक्रमात आले.
गेल्या वर्षी पाऊस चांगला असल्याने धरणाची स्थिती समाधानकारक आहे. कोरोना काळात आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना काही महत्वाच्या विभागांना आम्ही निधी कमी केला नाही. जिल्हा विकास निधीला कात्री लावली नाही. रियल इस्टेट क्षेत्रात आम्ही मुद्रांक शुल्क कमी केले, त्याला डिसेंबरपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जानेवारीपासून तेवढी खरेदी नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतरही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबरच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. या सर्व वस्तुंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढली आहे. सोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. काही काळात पेट्रोल नक्कीच 100 रुपये गाठेल, असंही अजित पवार म्हणाले.
कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र आरोग्य मंत्र्यानी त्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. अजूनही बाजारातील अनेक सेवांना ग्राहकांचा हवा तेवढा प्रतिसाद नाही. हळूहळू भीती कमी होईल, त्यानंतर बाजारात तेजी येईल आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थसंकल्पाबद्दल सध्या काहीच बोलणार नाही. कारण ते सहकारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यासोबत बोलून ठरेल. अर्थमंत्री म्हणून माझ्या मनात निश्चित काही योजना आहेत.
आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय करतो, विसंवाद नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही भाजपपेक्षा बरेच पुढे राहिलो, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
वीजबिल माफी होणार का?
कोणतेही वक्तव्य करताना मंत्र्यांनी आर्थिक भार पडणार आहे, त्याचा अंदाज घेऊन बोलावे अशी अपेक्षा असते. कारण केलेली घोषणा तिजोरी पेलू शकणार का हे महत्वाचे आहे. कोणत्याही (नितीन राऊत) मंत्र्याने शहानिशा न करता घोषणा केली असे मी म्हणणार नाही, उद्या अजित पवार यांनीही अंदाज घेऊन बोलले पाहिजे.
जेव्हा महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून तारखा सांगितल्या जातात. मात्र, तसे काही घडलेले नाही. जोवर या सरकारला तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे हे सरकार अस्थिर होणार नाही. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना अनेक लोकं भेटत राहतात. त्यामुळे अडाणी त्यांना भेटले म्हणून काही घडलं असे नाही. (राज ठाकरे यांचे नाव न घेता वक्तव्य)
जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. (अमित शाह यांच्या शिवसेनेच दगाबाजी केली या वक्तव्यावर)