नागपूर : शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. शिक्षणाच्या (Education) गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असं दीपक केसरकर म्हणाले.  शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर निवृत्ती पर्यंत एकाच शाळेवर राहण्याची मुभा यापुढे शिक्षकांना असणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिलीये. 


येत्या 20 डिसेंबरपासून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तसेच  निवडणूक आयोग आणि जनगणना व्यतिरिक्त इतर कोणतीही शासकीय कामं शिक्षकांना विभागाच्या परवानगीशिवाय देता येणार नाही, असं स्पष्टपणे केसरकरांनी सांगितलं आहे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणे हे राज्य सरकारचे धोरण नाही. एक विद्यार्थी असेल तरीही शिक्षक मिळेल.  जेथे  प्रवासाचा प्रश्न असेल त्या विद्यार्थ्याला शाळेत पोहवणे ही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं. 


शाळाबाह्य मुलांसाठी राज्य सरकारचं नवं अभियान


 राज्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी  विधानसभेत दिली. शाळाबाह्य मुलांबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. 


राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु


राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.  या वेळी ॲड. आशिष शेलार, नाना पटोले, ॲड. यशोमती ठाकूर, योगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारले.


हेही वाचा : 


Rohit Pawar : कर्जत MIDC प्रकरणी अजितदादांनी राम शिंदे सांगतात तसंच करावं, पण निर्णय चुकला तर मात्र शांत बसणार नाही; रोहित पवारांचा अजित पवारांना इशारा