नागपूर : नागपूर शहरातील पोलीसांचा असंवेदनशीलपणा एका घटनेतून समोर आलाय. माझा तरुण मुलगा बेपत्ता असून तो अखेरचा काही कुख्यात गुन्हेगारांसोबत दिसला होता. ते त्याला बळजबरीने घेऊन गेलंय, असं वारंवार सांगणाऱ्या वृद्ध बापाची दखल नागपूर पोलिसांनी घेतलीच नाही. अखेरीस 67 दिवसानंतर त्या तरुण मुलाचा मृतदेहच वृद्ध वडिलांच्या नशिबी आला. पोलीसांच्या निष्क्रियता आणि निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या या नागपूरच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय.
भागवत ठाकरे (वय 60)27 नोव्हेंबर 2019 ला त्यांचा 25 वर्षांचा मुलगा मोनेश मित्रांना भेटून येतो असे सांगून गेला तर घरी परतलाच नाही. त्याच रात्री उशिरा त्याचा मोबाईलही बंद झाला. कोणीही वडील करेल तसेच प्रयत्न भागवत ठाकरे यांनी ही केले. पोलिसांकडे रीतसर तक्रार ही दिली. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारींकडे लक्षच दिलं नाही. तुझा मुलगा पळून गेला असेल. कुठे फिरायला गेला असेल अशी उत्तर देऊन पोलीसांनी वृद्ध भागवत ठाकरे यांना गप्प केलं. आता घटनेच्या 67 दिवसानंतर मोनेशचा मृतदेहाचे काही अवशेष नागपूरच्या जामठा परिसरात एका नाल्यात सापडले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरला मोनेश पारडी परिसरातल्या काजल बारमध्ये आपल्या मित्रांसह बसलेला असताना कुख्यात गुन्हेगार अक्षय येवले त्याचे सहकारी निलेश आग्रे आणि अमोल हिरापूरे हे तिथे आले. काही वेळांनी तिघांनी मोनेशला सोबत नेले. तिघांनी मोनेशची त्याच रात्री परिसरातील शाळेच्या मागे एका झुडुपामध्ये धारधार शस्त्रांनी हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह तिथेच जाळून टाकला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे अवशेष अनेक किलोमीटर अंतरावरील जामठा परिसरात एका नाल्यात फेकून दिले.


नागपूर हत्याकांडाचा 35 दिवसांनी उलगडा; पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटातून प्रेरणा

तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा मृत्यू - 

मोनेश बेपत्ता झाल्यापासून त्याचे वडील भागवत ठाकरे अनेक वेळेला पोलिस ठाण्यात गेले, वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी मुलाच्या शोधासाठी आर्जव केले. मात्र, पोलिसांनी प्रत्येकवेळी त्यांच्या आर्जवांकडे दुर्लक्ष केलं. ज्या कुख्यात अक्षय येवले वर माझ्या मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल माझी शंका आहे. तो अक्षय मला धमकावतोय, जीवे मारण्याची धमकी देतोय. भागवत ठाकरे यांच्या अशा तक्रारीकडेही पोलीसांनी लक्ष घातलं नाही. गेल्या 67 दिवसात पोलिसांनी भागवत ठाकरे यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते. तर कदाचित त्यांचा तरुण मुलगा आज जिवंत राहिला असता. आता पोलीसांनी मोनेशच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड अक्षय येवलेसह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. तर इतर काही आरोपी फरार आहे. मात्र, ठाकरे कुटुंबाचे जे नुकसान झालेले आहे, ते कधीच न भरून निघणारे आहे.

Nagpur Metro | नागपूर मेट्रोकडून नवी जाहिरात प्रकाशित, पालकमंत्री, गृहमंत्र्यांच्या फोटोंचा समावेश | ABP Majha