PIB Fact Check of GST On Rent : दररोज सोशल माध्यमांवर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही फेक असतात, तर काही फायदेशीर असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामधून जीएसटीबाबत माहिती दिली जात आहे. एखाद्या व्यक्तीनं निवासी मालमत्ता (Residential Property) भाड्यानं घेतली आणि ती व्यावसायिक वापरासाठी (Commercial Use) वापरली, तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला 18 टक्के जीएसटी (GST on Rent) भरावा लागेल, अशा आशयाची ती पोस्ट आहे. पण आता सरकारनं स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं असून व्हायरल होणाऱ्या वृत्ताचं खंडन केलं आहे. 


सोशल मीडियावर (Social Media) ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्यामुळे सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारनं भाड्याच्या घरावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी जाहीर केलेला नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 



पीआयबीनं केला उलगडा 


पीआयबी (PIB) फॅक्ट चेकनं ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, पीआयबीनं म्हटलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीनं निवासी मालमत्ता भाड्यानं घेतली आणि त्या ठिकाणाहून जीएसटी नोंदणीकृत (GST Registered) कंपनीचा व्यवसाय केला तर त्याला जीएसटी भरावा लागेल. जर रहिवाशानं ती जागा त्याच्या वैयक्तिक वापरासाठी घेतली, तर अशा परिस्थितीत त्याला कर भरावा लागणार नाही.


काय आहे नियम?


काही दिवसांपासून ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "आता भाडेकरूंना भाड्यासोबत 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सरकारनं याबाबत स्पष्टीकरण दिलं असून, जीएसटी कौन्सिलच्या (GST Council Meeting) गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, जर एखाद्या व्यक्तीनं व्यावसायिक कारणांसाठी निवासी मालमत्ता भाड्यानं दिली, तर त्या व्यक्तीला भाड्यासोबत जीएसटीही (GST) भरावा लागेल."


जर त्या व्यक्तीनं मालमत्ता कोणत्याही वैयक्तिक वापरासाठी घेतली, तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जीएसटी भरावा लागणार नाही. यासोबतच सामान्य पगारदार वर्गातील व्यक्तीला भाड्याचे घर घेतल्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी (GST On Tenants) भरावा लागणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.