नागपूर : विदर्भात यावर्षी कापूस खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. विदर्भात मान्सून दाखल झाला असतानाही शेतकऱ्यांच्या घरात गेल्या हंगामाचा कापूस अजूनही पडून असल्याने यावर्षी बियाणे खरेदीपासून इतर सर्व खर्चांसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरणं सुरु केलं आहे. आज नागपुरात भाजपच्या ग्रामीण भागातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन कापूस खरेदी संदर्भात शासनाच्या प्रयत्नांचा निषेध केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांनी त्यांच्या हातात पऱ्हाटी (कापसाच्या फांद्या), कापसाची माळ तसेच बियाणांचे पाकीट घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले.
विदर्भ आणि मराठवाड्यात लाखो शेतकरी खरीप हंगामात कापसाचं पीक घेतात. मात्र पुढील हंगाम सुरु होण्याच्या आधीच पणन महासंघ आणि सीसीआयकडून त्याची खरेदी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात दिरंगाई झाली आहे. महासंघाकडून शेतकऱ्यांना टोकन नंबर मिळाल्यानंतरही खरेदी केंद्रावर अनेक दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होत नाही. आता तर पावसाळा सुरु झाला असून यंदाचा खरीप हंगामही तोंडावर आला आहे. असं असताना मागील हंगामाचा कापूस विकला न गेल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. आज याच मुद्द्याला हाताशी धरत भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केलं.
सरकार अत्यंत धीम्या गतीने कापूस खरेदी करत असून जून महिना अर्धा संपला तरी 65 टक्के शेतकऱ्यांच्या घरातला कापूस खरेदी करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. व्यापाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जाणूनबुजून शेतकऱ्यांचा कापूस हळुवार खरेदी केला जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. या मागे मोठा घोटाळा असून राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 2 हजार रुपये एवढे भावांतर म्हणजेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेत बावनकुळे यांनी आज नागपूरच्या संविधान चौकावर प्रतिकातमक आंदोलन केले. पणन महासंघाने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याने बहुतांशी शेतकऱ्यांच्या घरात कापूस पिवळा पडला आहे किंवा त्याचा दर्जा घसरला आहे. शेतकऱ्यांना कमी किमतीत कापूस व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर केले जात असून यामागे मोठा घोटाळा झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात सरकारच्या उदासीनतेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील हजरो शेतकरी कुटुंब हवालदिल झाल्याचे बावनकुळे म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे आणि खते देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही. त्यामुळे सरकारने बांधावर बियाणे आणि खते देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी ही करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी आणि गरीब कुटुंबांचा 300 युनिटपर्यंतचं वीज बिलही माफ करावं आणि त्यासाठी राज्य सरकारने नुसत्या घोषणा न करता आर्थिक तरतूदही करावी, अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली आहे.