नागपूर : वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नागपुरात देखील ऑक्सिजन रुग्णवाहिकेअभावी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

नितीन अडयालकर (53 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर नितीन होम आयसोलेशनमध्ये होते. शनिवारी (5 सप्टेंबर) नितीन यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करुन अॅम्ब्युलन्स बोलवली. अॅम्ब्युलन्स आली मात्र त्यात ऑक्सिजन नसल्यामुळे नितीन यांना रुग्णालयात दाखल करता आले नाही. त्यानंतर अडयालकर कुटुंबियांनी मनपा, इंदिरा गांधी (मेयो) रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय सर्व ठिकाणी अॅम्ब्युलन्ससाठी फोन केले. त्यानंतर तब्बल साडे तीन तासांनी अॅम्ब्युलन्स आली. त्यानंतर नितीन अडयालकर यांना शासकीय रुग्णालयात नेले. तिथ् अॅम्ब्युलन्समध्ये तपासणी करण्यात आली. मात्र तोपर्यंत नितीन अडयालकर यांचा मृत्यू झाला होता. नितीन यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते हरीश अडयालकर यांचा तीन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

केवळ रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन नसल्याने या रुग्णाचा जीव गेला आहे, असा आरोप नातेवाईकांना केली आहे. लागलीच उपचार आणि रुग्णवाहिका मिळाली असती, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हे झाले आहे. त्यामुळे नागपुरातील आरोग्य यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी नागपुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच नागपूरचा रिकव्हरी रेट देशपातळीवर आदर्श मानला जात होता. त्याच नागपुरात गेले 10 ते 15 दिवस रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर रोज 40 ते 50 रुग्णांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की, नागपुरात स्थिती का बिघडली. गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने काल नागपूरचा दौरा केला. इथल्या प्रशासनाशी बोलून नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत काही सूचना केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Nashik MNS Protest | धूळखात पडलेल्या व्हेंटिलेटरचा माझाकडून पर्दाफाश, हॉस्पिटलविरोधात मनसे आक्रमक