पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. पुण्यातील परिस्थिती ही हाताबाहेर जात असतानाच ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत ही धक्कादायक बाब समोर आली. ऑक्सिजनचा योग्य तो पुरवठा व्हावा यासाठी पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जावडेकर यांच्यासमोर ही कैफियत मांडली. त्यामुळे ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावले आहेत आणि हवा तितका पुरवठा उपलब्ध होईपर्यंत अनेक रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येणार आहे.


पुण्यात 1 ऑगस्टला 30 हजार 266 अॅक्टिव्ह रुग्ण होते तर 2 हजार 35 मृतांची नोंद होती. तेव्हा रोज 175 ते 190 मेट्रिक टन ऑक्सिजनचा जिल्ह्यात पुरवठा व्हायचा.

6 सप्टेंबरला 34 हजार 597 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 4 हजार 575 मृतांची नोंद झालीये. हे पाहता काल (6 सप्टेंबर) 290 मेट्रिक टन ऑक्सिजनचा जिल्ह्यात पुरवठा झाला.

मार्च ते 31 जुलै या पाच महिन्यात 2 हजार रुग्ण दगावले होते. पण पुढील 37 दिवसातच दुपटीपेक्षा अधिक म्हणजे 4 हजार 575 रुग्ण दगावलेत. ही तुलना पाहता सद्यस्थितीला किमान 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणं गरजेचं आहे.


तारीख              रुग्ण             अॅक्टिव्ह             मृत्यू
1 ऑगस्ट           88,584           30,266               2035
5 सप्टेंबर         1,88,566           33,050               4495
एकूण वाढ       99,982              2,784                2460


अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे, जी पुण्याची चिंता वाढवणारी आहे. जम्बो हॉस्पिटल असो की इतर हॉस्पिटल्स असो रुग्णांच्या नातेवाईकांकडून मुख्य तक्रार केली जाते ती रुग्णांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर नसल्याची. त्याचाच परिणाम म्हणून की काय जम्बो हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि नर्सनी सामूहिक राजीनामे दिले. पण फक्त डॉक्टर आणि नर्स असून उपयोग नाही तर आत्ताच्या घडीला पुण्यात मोठ्या संख्येने ऑक्सिजन उपलब्ध होणं गरजेचं आहे.


अपुऱ्या सुविधा आणि औषधांची कमतरता यात आता ऑक्सिजनच्या तुटवड्याची भर पडली आहे. हव्या तितक्या ऑक्सिजनची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुण्याची आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवरच असेल.


पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या घरात
राज्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यातील काल 3 हजार 800 जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 99 हजार 303 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 4 हजार 429 आहे. यापैकी 1 लाख 33 हजार 491 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 61 हजार 383 आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.


घाईघाईत उद्घाटन केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा
दरम्यान घाईघाईत उद्घाटन केलेल्या पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये आरोग्य सुविधाच उपलब्ध नसल्याचं पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर पुण्याची आरोग्य यंत्रणेची सत्यपरिस्थिती समोर आली. कोरोनाबाधित असलेल्या पांडुरंग रायकर यांची ऑक्सिजन पातळी खालवली होती. सुविधांअभावी त्यांना जम्बो रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. परंतु वेळेत कार्डिअॅक अॅब्युलन्स न मिळाल्याने पांडुरंग रायकर यांनी प्राण सोडले.


नाशिकमध्येही व्हेंटिलेटर धूळखात
दुसरीकडे पंतप्रधान केअर फंडातून नाशिकला मिळालेले 15 व्हेंटिलेटर धूळखात असल्याचं एबीपी माझाने काही दिवसांपूर्वीच समोर आणलं होतं. ज्या प्रेशरने ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे तशी टाकी उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटरचा वापर झालेला नाही.


Pune Jumbo Covid Hospital | पुणे जम्बो कोविड हॉस्पिटलच्या स्टाफने राजीनामा का दिला? रुग्णालयाची दूरवस्था पाहा