नागपूर : भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर कोर्टात याचिका दाखल केली आहे. अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्याविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे. मागील काही महिन्यांपासून किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात, नेत्यांविरोधात सातत्याने आरोप करून मोहीम उघडली आहे.


अतुल लोंढे यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. त्यामुळे सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.


याचिका दाखल झाल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की,  सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. लोंढे यांनी सोमय्या यांच्याविरोधात नागपूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 


किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता अशोक चव्हाण आणि हसन मुश्रीफ
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण आणि हसन मुश्रीफ या महाआघाडीतल्या मोठ्या मंत्र्यांना निशाणा बनवले आहे, बुलढाणा सहकारी बँकेत आयकर विभागाने केलेल्या गाडीमध्ये बाराशे बेनामी अकाउंट आणि ज्या 53 कोटी रुपये सापडले आहेत, हे पैसे आणि हे अकाउंट कोणाचे आहेत? असा सवाल सोमय्या यांनी अशोक चव्हाण यांना विचारला आहे, तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाच्या जयस्तुते या कंपनीला महा विकास आघाडीतील अनेक कंत्राटे नियम डावलून मिळाल्याचे आरोप सोमय्यांनी केले आहेत.