Nagpur Diwali 2021 : नागपुरात रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी नागपुरात फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी  ते 10 अशी ठरवून दिली आहे. त्यामुळे नागपूरकरांना फटाके फोडायचे असल्यास या वेळेचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी देखील फक्त ग्रीन फटाक्यांची खरेदी आणि विक्री करावी, तसेच ग्राहकांनीही फटाके विकत घेताना, ते ग्रीन फटाके आहेत की नाही? याची खातरजमा करावी, असं आव्हान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे. 


दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात सर्रास फटाके विक्री सुरु असून लोकंही वेळ न पाळता फटाके फोडत आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडणाऱ्यां विरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी शहरात 33 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. काल (मंगळवारी) रात्री चार ठिकाणी पोलिसांनी कारवाईसुद्धा केली आहे. यासोबतच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे.


उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार


हवेची गुणवत्ता चांगली राहावी आणि माजी वसुंधरा कार्यक्रमातंर्गत अधिकाधिक निधी मिळावा, हे कारण पुढे करुन विभागीय आयुक्तांनी फटाक्यांविना दिवाळी साजरी करण्याच्या सुचना काढलेल्या होत्या. नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या निर्णायामुळं यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का? असा प्रश्न नाशिककरांसमोर उपस्थित झाला होता. तसेच, लोकप्रतिनिधींसह फटाका विक्रेत्यांनीही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचं प्रमुख कारण म्हणजे, ज्या विक्रेत्यांनी गेल्या वर्षभरापूर्वीच फटाके खरेदी केले होते, त्या फटाक्यांचं काय करायचं? हा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच साधारणतः दीड वर्षानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे येणारी दिवाळी उत्साहात साजरी करावी अशी, सर्वसामान्यांची अपेक्षा होती. परंतु, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.