Nagpur News : सरकारकडून मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात येत असल्याची भाषा होत असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. मोठ्या संख्येने तरुणाई बेरोजगार (unemployed youth) असून, आपली शैक्षणिक आहर्ता बाजूला ठेवून मिळेल ती नोकरी करण्याच्या तयारीत आहेत. तसेच नोकरी मिळवण्यासाठी पैसे मोजण्याचीही तयारीही नाईलाजाने हताश झालेल्या युवकांनी केली आहे. याचाच फायदा घेत सोयबर चोरट्यांकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यातच बेरोजगार युवकांच्या तक्रारींचा आलेख झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे फसवणूक झालेले तरुण हे उच्चशिक्षित आहेत.


गेल्या तीन दिवसांतच रोजगाराच्या नावाने गंडा घातल्याप्रकरणी (Fraud in the name of employment) शहरातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्रिशा नावाच्या 20 वर्षीय तरुणीला मोबाईवर नोकरीच्या संधीचा संदेश आला. इच्छुक असल्यास दिलेल्या लिंकवर माहिती भरण्याचे सांगण्यात आले. तरुणीला नोकरीची गरज असल्याने तिने सुरुवातीला स्वतःची माहिती भरली. माहिती भरल्यावर लिंकद्वारे तरुणीच्या मोबाइलमधील युपीआयचे नियंत्रण घेऊन तिचे खाते रिकामे करण्यात आले. यानंतरही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तरुणीने तिच्या वडिलांच्या मोबाईलमधून प्रयत्न केले. तसेच त्यातूनही काम न झाल्याने आईच्या मोबाईलमधून प्रयत्न केले. मात्र माहिती भरल्यावर तरुणीच्या खात्यातून 10 हजार 440 रुपये तर वडिलांच्या खात्यातून 20 हजार 440 आणि आईच्या खात्यातून 73 हजार 154 रुपये ऑनलाईन काढून घेण्यात आले. तिच्या तक्रारीवरुन शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आपल्या मुलीला मोबाईल देण्याचा चांगलाच आर्थिक फटका पालकांना बसला आहे.


वन विभागात नोकरीचे दिले बनावट नियुक्तीपत्र


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाव्हा येथील रहिवासी राजू सोनेकर (32) स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आरोपी निकेश रामभाऊ पाचपुते, नरेश नामदेव बोदे (रा. रंगारी तापर, सौंसर, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश), सतीश रामकृष्ण ठाकरे, बेबीबाई रामकृष्ण ठाकरे (बोटोना, पोलीस ठाणे पारडी, ता. कारंजा, जि. वर्धा) यांनी संगनमताने राजूला वनविभागात (job in forest department) नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. बेबीबाई ठाकरे हिने तिचा जावई आयएएस असल्याची बतावणी करुन 2018 ते 2022 या काळात 4 लाख 40 हजार रुपये घेतले. नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र दिले. नियुक्ती प्रमाणपत्र बनावट असल्याचे राजूच्या लक्षात आहे. त्याच्या तक्रारीवरुन अंबाझरी पोलिसांनी चारही आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


ही बातमी देखील वाचा


Vidarbha Industries : एमआयडीसीत सात हजार प्लॉट्स उद्योगांच्या प्रतीक्षेत, जमीन अधिग्रहणासाठी आणखी 30,000 कोटींचा खर्च अपेक्षित