नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या मुदतीवरुन विरोधकांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटळला आहे. काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, प्रशांत पवार यांच्यासह इतर काही उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता.


आज मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संदीप जोशी, वकील उदय डबले आणि पारिजात पांडे हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. विरोधकांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस, जय जवान जय किसान संघटना, आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित होते.


नोटरी स्टॅम्प जुन्या तारखेचा मारला गेला आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील हे मान्य केलं आहे. मात्र केंद्र शासनाने नोटरीची मर्यादा पाच वर्षांसाठी वाढवून दिली असून तशी ऑर्डर दिल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनउमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून आशिष देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत.