नागपूरः समाजातील वंचित आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात माध्यमांचे मोठे योगदान आहे. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेमुळेच आज देशातील नागरिकांचे माध्यमांवर विश्वास आहे. पत्रकारितेचा हाच वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब नागपूरच्यावतीने एबीपी नेटवर्कचे (ABP Network Editorial) संपादकीय उपाध्यक्ष राजीव खांडेकर व एबीपी माझाच्या उप कार्यकारी संपादक सरिता कौशिक (Sarita Kaushik) यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षणीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे (State Information Commissioner Nagpur), साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या व प्रसिद्ध लेखिका आशाताई बगे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी (Dr. Girish Gandhi), प्रेस क्लब ऑफ नागपूरचे (Press Club Nagpur) अध्यक्ष प्रदीप मैत्र (Pradeep Maitra) यांच्यासह शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे न्यायमूर्ती रोहित देव (Rahul Deo, Mumbai High court) म्हणाले, 'सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीवर लोकं लगेच व्यक्त होतात. त्यामुळे माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना वेळेत अचूक बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. आपण आपल्या कार्याशी प्रमाणिक असलो तर आपण कार्य करत असलेल्या क्षेत्रातील उच्च पदापर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे'.
यावेळी बोलताना प्रसिद्ध लेखिका आशाताई बगे म्हणाल्या, 'कुठल्याही क्षेत्रात काम करणे महिलांसाठी कठीण नसते, ज्या प्रकारे घर आणि कुटुंब सांभाळतात, त्याच प्रकारे त्यांच्यासाठी कोणतेही काम आव्हानात्मक नाही. त्या सहज रित्या आपली जबाबदारी पार पाडतात. तसेच महिलांनी आपले काम प्रमाणिकपणे केल्यास कुठलीही उंची गाठणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. याचे मूर्तीमंद उदाहरण म्हणजे आपल्या नागपूरच्या कन्या सरिता कौशिक यांची नियुक्ती'.
यावेळी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी प्रास्ताविक करताना म्हणाले की, 'जेव्हा आम्ही सरिता कौशिक यांना आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे म्हटले तेव्हा त्यांनी संकोच केला. मात्र आमच्या जिद्दीमुळे त्या आम्हाला टाळू शकल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांनी सरिता कौशिक यांचा प्रवास जवळून बघितला आहे. तिची बातम्यांसाठीची चिकाटी तसेच तिचे दृष्टीकोण हे प्रत्येक पत्रकारासाठी प्रेरणादायी आहे.' मी जेव्हा पत्रकारितेची सुरुवात केली त्या काळात बोटावर मोजण्याएवढ्याच मुली या क्षेत्रात होत्या. मात्र मला ज्या प्रकारे माध्यमातील सर्व सहकार्यांनी मदत केली. आपल्या कुटुंबात मला समावून घेतले, याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. ही नवीन मिळालेली जबाबदारी मी विश्वासार्हता, सचोटी आणि प्रामाणिकपणाणे पूर्ण करेल, अशी ग्वाही यावेळी मनोगत व्यक्त करताना सरिता कौशिक यांनी दिली. सत्कार सोहळ्या उपस्थित सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि माध्यमकर्मींनी सरिता कौशिक यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या