अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूरमधून तब्बल 58 उंट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. कत्तलीसाठी या उंटांची राजस्थानातून तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील यशासाठी  काळी जादू करायला उंटांचा वापर होत असल्याचा संशय आहे.


तब्बल 58 उंटांचा तांडा राजस्थानातून हैदराबादकडे निघाला होता. अकोल्यातील वनराई गोरक्षण संस्थेच्या श्रीकांत बोरकरांना संशय आला. त्यांनी थेट पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उंटांच्या तस्करीचा पर्दाफाश केला.

या उंटांच्या तस्करीमागचं कारण ऐकून कोणालाही धक्का बसेल. सध्या तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा ज्वर आहे. निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी तेलंगणात काळ्या जादूच्या नावाखाली अघोरी प्रकार चालतात. काळ्या जादूसाठी उंटांच्या अवयवांना मोठी मागणी असते. त्यासाठी हे उंट नेले जात असल्याचा संशय आहे.

या उंटांसोबत असलेल्या मजूरांनी मात्र तस्करीचे आरोप फेटाळून लावले आहेत. या उंट प्रकरणावरुन मोठं रॅकेट समोर येऊ शकतं. मात्र त्यासाठी आता पोलिस आणि इतर सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याची गरज आहे.