नागपुरात ओव्हरटेक करताना कार उलटून सख्ख्या भावांचा मृत्यू, Facebook Live मध्ये अपघाताचा थरार
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2019 08:10 AM (IST)
अपघात होण्यापूर्वी मित्र कारमधून फेसबुक लाईव्ह करत होते, त्यामुळे अपघाताचा थरार फेसबुकवर लाईव्ह कैद झाला.
नागपूर : भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याने नागपुरात सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे अपघात होण्यापूर्वी हे मित्र कारमधून फेसबुक लाईव्ह करत होते, त्यामुळे अपघाताचा थरार फेसबुकवर लाईव्ह कैद झाला. 28 वर्षीय पुंकेश पाटील आणि 23 वर्षीय संकेत पाटील हे भाऊ नागपूरच्या कैलासनगरमध्ये राहत होते. काटोल तालुक्यात खाजगी कामानिमित्त ते मित्रांसह झायलो गाडीने जात होते. गाडीमध्ये एकूण नऊ जण बसलेले होते. हातला शिवाराजवळ गाडी आल्यावर एकामागोमाग एक गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची झायलो कार अनियंत्रित झाली आणि गाडीने अनेकवेळा उलटून झाडावर आदळली. विशेष म्हणजे अपघात होईपर्यंत या घटनेचं फेसबुक लाईव्ह सुरुच होतं. सुरुवातीला फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ पाहणारे मित्र त्यांना एन्जॉय करण्याचा सल्ला देत होते. मात्र अचानक अपघात होताच, सर्वांचा नूर पालटला. अपघातात पुंकेश आणि संकेत पाटील या सख्ख्या भावंडांना प्राण गमवावे लागल्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात दोघं जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल आणि नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.