नागपूर : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नागपूरलगतच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. उपनगरातून शहरात कामानिमित्ताने येणाऱ्या कामगार वर्गाला मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.


नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एक भाग असलेल्या रिच वनचे काम अंतिम टप्प्यात असताना, आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील उपनगरांना मेट्रो जोडली जाणार आहे. नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा 48.3 किमीचा असणार आहे. यामध्ये एकूण 35 स्थानकांचा समावेश आहे.


नागपूर मेट्रो - 2 ची वैशिष्ट्ये


एकूण 35 स्थानके असणार
एमआयडीसी ते मिहान (18.5 किमी)
ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी (13 किमी)
लोकमान्य नगर ते हिंगणा (6.6 कि.मी)
प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्ट नगर (5.5 कि.मी)
वासुदेवनगर ते दत्तवाडी (4.5 किमी)


नागपूर महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 11 हजार 216 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. हा दुसरा टप्पा 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.