नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सवांतर्गत 'हरघर तिरंगा' या उपक्रमाचा शुभारंभ उद्या 13 ऑगस्ट रोजी होणार असून 15  पर्यंत साजरा होणार आहे. याशिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयाने पुढील तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहे. जिल्हा प्रशासनाने 14 ऑगस्ट रोजी नव्यापिढीला फाळणीच्या वेदना माहिती व्हाव्यात यासाठी विभाजन विभिषिका स्मृती दिवसानिमित्त 14 ऑगस्टला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सायंकाळी 4.00 वाजता सेतू केंद्रातील या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.


प्रदर्शनीचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांचे हस्ते उद्घाटन


नागपूर माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्ममाने आजादी का अमृत महोत्सव प्रदर्शनीचे आयोजन 13 ते 17 ऑगस्ट रोजी मेट्रो जंक्शन, सिताबर्डी नागपूर येथे  करण्यात आले आहे. उद्या या प्रदर्शनीचे उदघाटन रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनीत सन 1700 पासून 1947 पर्यंतचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व महापुरुषांची माहिती, स्वातंत्र्यानंतरचा भारत एकसंघ करण्यासाठी केलेले प्रयत्न, भारताचा संविधान, स्वतंत्रता आंदोलनातील प्रमुख स्थळ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश असलेले  छायाचित्र प्रदर्शन असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव प्रदर्शनीचा लाभ नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.


फाळणीच्या वेदना दाखविणारे प्रदर्शन


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रातिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी. याच उद्देशाने सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. तर देश स्वतंत्र होत असतांना झालेल्या फाळणीचे दु:ख व त्याच्या वेदना सामान्य जनतेला नव्या पिढीला कळाव्यात यासाठी केंद्रशासनाने फाळणीच्या वेदना दाखविणारे प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत चित्रप्रदर्शन लावण्यात येत आहे. तसेच फाळणीचे दु:ख सोसल्या कुटुंबाचा सन्मान नागरिकत्व दाखल्याचे वितरण करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाला संबोधित करणार आहे.


Ganeshotsav 2022: फुटाळ्यात 4 फुटांवर मूर्ती विसर्जनावर बंदी, मंडळांना परवानगीसाठी एक खिडकीची व्यवस्था