नागपूर : माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिलाय.  


नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
 


स्वतःच्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी कसे प्रयत्न केले, याचे उदाहरण उपस्थितांना सांगताना गडकरी यांनी सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे मत व्यक्त केले. आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही असे गडकरी यावेळी म्हणाले. 


काय म्हणाले नितीन गडकरी?


"सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या", असा सल्ला नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.


नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरींना ओखळले जाते. त्यांच्या आजच्या वक्तव्याची देखील आता जोरदार चर्चा होत आहे.  


महत्वाच्या बातम्या


Nitin Gadkari : रस्ते अपघातांच्या बाबतीत संवेदनशीलता गरजेची, जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील : गडकरी 


जेव्हा PM मोदींनी बांगलादेशच्या PM शेख हसीनासमोर केले नितीन गडकरींचे कौतुक आणि एकच हशा पिकला, काय म्हणाले मोदी?