नवी दिल्ली : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज आणि अनुसूचित जातीतील समुदायाची इतकी मोठी संख्या असतानाही आम्ही कायम सत्तेपासून दूर का राहिलो, हे जवळून पाहण्यासाठी चाललो आहे, असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही आझाद यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र ही आमच्यासाठी पूजनीय भूमी आहे, कारण ती बाबासाहेबांची भूमी आहे. भीमा कोरेगाव हे आमच्यासाठी तीर्थस्थळ आहे. या मातीला नमन करण्यासाठी मी चाललो आहे, असं आझाद म्हणाले. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

आम्हाला दिलेली परवानगी नाकारल्याचं माझ्या कानावर आलं, पण संघटनेने ज्या ठिकाणी ठरवलं आहे, तिथेच सभा होईल. त्या ठिकाणचे वातावरण खराब होऊ नये ही सरकारची जबाबदारी असल्याचंही आझाद म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज आणि अनुसूचित जातीतील समुदायाची इतकी मोठी संख्या असतानाही आम्ही कायम सत्तेपासून दूर का राहिलो, हे जवळून पाहण्यासाठी चाललो आहे. महाराष्ट्रात आम्ही शासक बनू, मालक बनू यासाठी समाजाची ताकद मजबूत करायला चाललो आहे, असा एल्गारही आझाद यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची मोठी ताकद आहे मात्र तरीही इतरांकडे सारखे मागत फिरतात 'हमे सत्ता दो हमे सत्ता दो'. महाराष्ट्राच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होईल आणि या समाजाच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला.

खोटे गुन्हे लावले

सहारनपूरमध्ये ज्यांनी आमच्यावरती अत्याचार केले त्यांनाच वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. माझ्यावरती एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण कोर्टात माझ्याविरोधात काहीच पुरावे मिळाले नाहीत. जेलमध्ये माझ्या वरती उपचार केले गेले नाहीत, माझ्या नातेवाईकांना भेटू दिले गेले नाही, असा दावा आझाद यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड सरकारकडून घेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

2014 मध्ये 'भीम आर्मी'ची स्थापना केली. शिक्षणाच्या क्षेत्रातही आम्ही गेल्या काही दिवसांपासून काम करत आहोत.
काशिराम हे माझे आदर्श आहेत, त्यांचा संघर्ष मी पाहिलेला आहे. तोच वारसा पुढे चालवायचा आहे, असा मानस चंद्रशेखर आझाद यांनी बोलून दाखवला.

आझाद ते रावण

चंद्रशेखर आझाद हे नाव माझ्या वडिलांनी दिलं. नंतर काही कारणांमुळे नंतर रावण हे नाव जोडलं गेलं. समाजाने दिलेलं नाव मी स्वीकारलं असल्याचंही ते म्हणाले. नंतर काही जण वेगळ्या पद्धतीने याचा वापर करु लागले. योगीजी प्रचारात म्हणू लागले, की जे रामभक्त आहेत त्यांनी आम्हाला मत द्यावं, आणि जे रावणभक्त आहेत, त्यांनी दुसऱ्या पक्षांना द्यावं, असंही आझाद यांनी सांगितलं.

भीम आर्मी हे नाव कसं पडलं?

भीम आर्मी बहुजन समाजाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी काम करणारी आहे. लोक आमच्या घरात घुसून मारणार असतील तर आम्ही रक्षण करायचं नाही का? असा सवाल करत 'याला कुणी हिंसा म्हणणार असेल तर ते त्यांनी मानावं' असं चंद्रशेखर आझाद म्हणाले.

मला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सारखे काही ना काही प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीचं हनन असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकारणात येण्याचा तूर्तास विचार नाही. जे समाज आदेश देईल त्यानुसार काम करत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपविरोधात राग

भाजपविरोधात आमचा राग आहे, कारण भाजपला चालवणारा संघ आहे आणि संघ देशाला तोडण्याचे काम करत आहे, असा घणाघातही चंद्रशेखर आझादांनी केला. जे लोक या देशाच्या तिरंग्याला मानत नाहीत, ज्यांनी बाबासाहेबांचे विचार मातीत घालवले, जे पूर्णपणे संविधानविरोधी आहेत त्यांचा आम्ही विरोध करत आहोत, असंही ते म्हणाले.

हे सरकार पूर्णपणे सामान्य नागरिकांच्या विरोधातलं आहे. बुलंदशहरमध्ये अनुसूचित जातीतील दोघांना मारल्यानंतर त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही, उलट हे मांस गायीचं होतं की आणखीन कुणाचं? याची चर्चा होते. भाजपची भूमिका ही दुतोंडी सापासारखी असून या सापांना आम्ही कदापि सत्तेत येऊ देणार नसल्याचंही आझाद म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी कोणासोबत जावं हे मी आता सांगू शकत नाही. पण अनुसूचित जाती आणि मुस्लिम हे दोन्ही मोठे वर्ग आहेत ते एकत्र झाले आणि ओबीसींची त्यांना साथ मिळाली तर आम्हाला सत्ता मिळवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. मी काँग्रेस किंवा भाजपचं सरकार आणू इच्छित नाही आम्हाला बहुजनांचे सरकार हवं आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले.

मायावतींची मी स्तुती केली पण त्या माझ्यापासून का दुरावा बाळगत आहेत हे त्यांनाच माहित. भाजपच्या शासनात लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात सरकारने जी कारवाई केली, ती स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, असा आरोप आझाद यांनी केला.

पाहा संपूर्ण मुलाखत