Nagpur : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar) हे अयोध्येत प्रभू श्री रामचरणी एक आगळावेगळा विक्रम अर्पण करणार आहे. प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) तयार करणार आहे.


प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. या शिरासाठी तब्बल 15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची भलीमोठी कढई नागपूरमध्ये तयार झालीये. ही कढाई देशातील सर्वात मोठी काढाई असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच ही काढाई अयोध्येला जाण्यास सज्ज असणार आहे.


देशातील सर्वात मोठ्या काढाईला हनुमान कढई असे नाव


प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आजवर आपल्या नावे अनेक विश्व विक्रम नोंदविले आहे. मात्र अयोध्येत (Ayodhya) येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमिती आपण आपली पाकसेवा अर्पण करावी, या उद्देशाने  प्रभूश्रीराम जन्मभूमी अयोध्येतील भव्य मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) तयार करणार आहे. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. त्यासाठी विष्णु मनोहर यांनी नव्याने भली मोठी काढाई तयार केली आहे. 15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची देशातील सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे. या कढईच्या आकारमान आणि भव्यतेवरून  या कढईला  हनुमान कढई असे नाव देण्यात आलंय. विष्णु मनोहरांच्या या संकल्पनेला नागपुरातील नागेश विश्वकर्मा यांनी अल्पावधीत सत्यात उतरवले आहे. 


कोराडी मंदिरात 6 हजार किलोचा शिरा


नागपूरातील कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिरात येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्याने याच कढईत 6 हजार किलोचा शिरा तयार केला जाणार आहे. त्यानंतर ही कढई आयोध्येसाठी रवाना केली जाणार आहे. या हनुमान कढईचा व्यास 15 फूट आहे आणि तिची खोली 5 फूट आहे. कढई स्टीलची असून मध्यवर्ती भाग लोखंडाचा बनलेला आहे. जेणेकरून शिरा शिजवताना जळणार नाही. 22 जानेवारीला मुख्य सोहळा असल्याने सर्वसामान्यांना अयोध्येत प्रतिबंध आहे. यामुळे 24 ते 26 जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आल्याचे विष्णू मनोहर म्हणाले. 


कारसेवा ते पाकसेवा 


राम हलवा तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ तीन तासांचा कालावधी लागणार आहे. आम्ही सकाळी 6 वाजता हलवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू. त्यानंतर, आम्ही त्यातील नैवेद्य म्हणून भगवान रामाला देऊ. मंदिर आणि शहरातील भक्तांमध्ये स्वयंसेवकांमार्फत हा प्रसाद वितरित करण्यात येणार असल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले. मी यापूर्वी अयोध्येत कारसेवेसाठी गेलो होतो. आता पाकसेवेसाठी जाणार आहे. माझ्यासाठी ही फार भाग्याची गोष्ट असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


ही बातमी वाचा: