Nagpur Winter Session :  राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं. या अधिवेशन काळात  विदर्भातील (Vidarbha)  प्रश्न, मागण्या मार्गी लागतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना असते. मात्र असे असताना देखील विदर्भातील आमदार येथील प्रश्नांवर कोणतीच भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू असतांना प्रत्येक दिवशी महत्व नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून दिवस वाया घालवले जात आहे. यापुढे विदर्भाच्या प्रश्नावर सभागृहात न बोलणाऱ्या  विदर्भातील आमदारांना गावबंदी करा.तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासा. अशी अजब मागणी जेष्ठ पत्रकार आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केली आहे. 


मी गोंधळ घातला नाही; उद्विग्न होत काही सेकंद बोललो


इतका खर्च करून महाराष्ट्राच्या विधिमंडळचे अधिवेशन नागपुरात होत असतांना विदर्भाच्या प्रश्नावर एकही आमदार बोलत नाही. त्यामूळेच उद्विग्न होत फक्त 10 ते 15 सेकंद मी पत्रकार गॅलरीतून बोललो मी कुठलाही वाद अथवा गोंधळ घातला नाही. यापुढे विदर्भाच्या प्रश्नावर सभागृहात न बोलणाऱ्या  विदर्भातील आमदारांना गावबंदी करा.तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासा. सरकारने माझ्यावर कोणतीही कारवाई केली तरी चालेल. खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर माझे नातेवाईक असल्याने मी सुटलो यात काहीही तथ्य नाही. असे प्रकाश पोहरे म्हणाले.   


नेमकं काय घडलं? 


विधानसभेमध्ये चर्चासत्र सुरु असताना पत्रकार गॅलरीमधून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या घोषणा एका वृत्तपत्राच्या संपादकांनी दिल्या. हे संपादक विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते देखील आहेत. त्यावेळी आशिष शेलार यांनी विधानसभेत भाषणाला सुरुवात केली होती. सुरु असलेलं चर्चा सत्र थांबवून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. यावर आशिष शेलार यांनी या संपादकांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान तात्काळ तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. 


या संपादकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. बुधवार 13 डिसेंबर रोजी संसदेत देखील असाच काहीसा प्रकार घडला. त्यानंतर विधानसभेत घडलेल्या या प्रकारावर विधानसभेत उपस्थित असणाऱ्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालिका अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संपादकांना तात्काळ सभागृहाच्या बाहेर काढले. दरम्यान यावेळी या संपादकांनी अधिवेशनाच्या कामकाजावर देखील भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. आता या मुद्द्यावर विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.