Nagpur News : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नागपुरातील (Nagpur) दहा सुपारी व्यापाऱ्यांवर (Betel nut traders) गुरुवारी धाडसत्र राबविले. या धाडसत्रात व्यापाऱ्यांकडून तब्बल 11 कोटी 50 लाख रुपयांची 290 टन सुपारी आतापर्यंत जप्त केली आहे. मात्र, आता यानंतर ईडीमार्फत व्यापाऱ्यांच्या अटकेचे सत्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्याच्या बातमीनंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशू भद्रा आदींवरही छापे मारल्याने मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहेत.


ईडीकडून लवकरच अटकसत्र जून 2021मध्ये सुपारी तस्करीचे प्रकरण समोर आले होते. यावेळी सीबीआयच्या पथकाने मुंबई येथे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने नागपूर, मुंबईसह देशभरातील 19 ठिकाणी छापे टाकले होते. चौकशीदरम्यान या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचेही आढळून आले. मुंबई येथे ईडीने गुन्हा दाखल करीत गुरुवारी सकाळी मुंबई व नागपुरातील ईडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी सुपारी प्रतिष्ठानांसह 10 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये नागपुरातील सुपारी व्यापारी व गोयल ट्रेडिंगचे प्रकाश गोयल, अल्ताफ कालीवाला, आसिफ, गनी, वसीम बावला, हेमंतकुमार गुलाबचंद, दिग्विजय ट्रान्सपोर्ट कंपनीचे हिमांशू भद्रा आणि दोन सीएचे कार्यालय व निवासस्थानांची झडती घेण्यात आली. त्यात कोट्यवधींचा माल आढळून आला. ईडीने तो जप्त केला. आता ईडीद्वारे त्यांच्या अटकेची तयारी करण्यात येत आहे.


इंडोनेशियातून येते सडकी सुपारी


व्यापाऱ्याद्वारे इंडोनेशियातून ही सडकी सुपारी भारतात आणण्यात येत असल्याची माहिती आहे. या सुपारीचा वापर पानमसाला आणि इतर अंमली उत्पादने तयार करण्यात होत असतो. ईडीच्या पथकाद्वारे झडतीदरम्यान 16 लाखांची रोख, प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज आणि हार्ड डिस्क जप्त केल्या. तपासणीनंतर शीतगृहांमध्ये 209 टन सुपारी असल्याचे आढळले. त्याच्या मालकाचे मात्र दस्तऐवजावर नाव नव्हते. त्यानंतर ईडीने ही सुपारी जप्त केली. नागपूर व गोंदिया येथे ती साठविण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.


सीबीआयनंतर ईडीची एंट्री


अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केली होती. छापेमारी केलेले सर्व व्यापारी परदेशातून सुपारी आयात (Foreign betel nut imports) करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत. छापेमारी करत असलेल्या ईडीच्या टीममध्ये मुंबई आणि अन्य शहरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या छापेमारीची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरल्याने इतर सुपारी व्यापारी सावध झाले. यापूर्वी सीबीआयनेही (CBI) धाडी घालून अवैध व्यापारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. 


ही बातमी देखील वाचा


Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची 'टेस्ट राईड'; फडणवीसांच्या हाती 'स्टेअरिंग'