Malkapur Urban Bank News : भ्रष्टाचाराच्या आरोपात फसवल्याचा आरोप करत अकोला येथील शिक्षण संस्थेच्या संचालकाने नागपुरात (Nagpur) धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. अजनी रेल्वेस्थानकावर हा आत्महत्येचा थरार घडला. अविनाश मनतकार (वय 60) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळीच त्यांनी जीवनयात्रा संपवली. मात्र, त्यांची ओळख पटू शकली नव्हती. शुक्रवारी सायंकाळी त्यांची ओळख पटताच सर्वत्र खळबळ उडाली.
मनतकार कुटुंब अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा येथील रहिवासी आहे. अविनाश मनतकार तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. त्यांचे तेल्हारा येथे पेट्रोलपंपसुद्धा होता. त्यांच्या पत्नी नयना या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर अर्बन बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले होते. तेव्हापासून ते सतत तणावात असायचे. गुरुवारी दुपारी मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात आले. दुपारी अविनाश यांनी पत्नीकडे शेगावला जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. थोड्याच वेळात परत येतो, असे सांगून ते ई-रिक्षाने निघाले. बराचवेळे लोटूनही ते परत आले नाही. यामुळे नयना काळजीत पडल्या. त्यांनी याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. शहरात सर्वत्र त्यांचा शोध सुरू होता. आज सायंकाळी त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले.
राजधानीसमोर घेतली उडी
लोहमार्ग पोलिस दलातील (RPF) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनतकार हे गुरुवारी दुपारी अजनी रेल्वे स्थानकावर पोहचले. फलाट क्रमांक 1 वरून जाणाऱ्या बेंगळुरू -दिल्ली राजधानी एक्स्प्रेससमोर त्यांनी उडी घेतली. अनेकांच्या डोळ्यादेखत हा मृत्यूचा धरार घडला. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कपड्याची तपासणी केली. पण, मोबाईलसह ओळख पटू शकेल असे काहीही त्यांच्याकडे नव्हते. शर्टच्या कॉलरवरील टेलरच्या टॅगवरून त्यांचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी नातेवाईकही शोध घेत होते. त्याचदरम्यान ओळख पटली आणि सारेच हादरले.
पोलिसांवरही गंभीर आरोप
बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणात नाव आल्यापासून ते कमालीचे अस्वस्थ होते. त्यांना पेट्रोल पंपसुद्धा विकावा लागला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेही सुसाईड नोट मिळाली नाही. त्याचवेळी एक सुसाईडनोट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. ती मनतकार यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईडनोट असल्याचे सांगितले जात आहे. त्यात बँकेशी संबंधित बड्या नेत्यांवर तसेच पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लोहमार्ग पोलिसांनीही त्याचे सुसाईड नोट लिहून ठेवल्याची चर्चा असली, तरी ती अद्याप आम्हाला मिळाली नसल्याने काहीही बोलणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले.
खळबळजनक सुसाईड नोट
मनतकार यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी स्वत:चा भ्रष्टाचार आमच्यावर लावून आम्हा पती-पत्नीला फसविले. या प्रकरणात संचालक मंडळ दोषी आहे की नाही, याची पोलिसांनी चौकशी केली नाही. संचेती लखानी यांनी दिलेल्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत त्यांनी लिहून ठेवले आहे. ही सुसाईड नोट व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
मी अविनाश मनतकर यांना ओळखतही नाही : चैनसुख संचेती
व्हायरल झालेल्या चिठ्ठीत करण्यात आलेल्या आरोपांबाबत माजी आमदार आणि मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी स्पष्टीकरण दिले असून ते म्हणाले, अविनाश मनतकर यांच्या आत्महत्ये बद्दल माध्यमातूनच माहिती मिळाली. आत्महत्येशी माझा दुरान्वये संबंध नाही , मी त्यांना ओळखत नाही. मात्र या चिठ्ठीमुळे माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी होत आहे. बँकेच्या अध्यक्षांचा कोणत्याही कर्जदाशी संबंधच येत नाही.