Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्रातील सीमाभाग (Maharashtra Karnataka Border Dispute) केंद्रशासित प्रदेश झाल्यास त्यातून नवे वाद निर्माण होतील. तसेच, आपली इच्छा असली तरी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना, त्याला केंद्र सरकार मान्यता देणार का? याबद्दल विचार करण्याची गरज आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या मागणीची हवा काढली आहे. विधानभवन परिसरात माध्यमांशी ते बोलत होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. मात्र ते कधी बॉम्बस्फोट करतील असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर ते म्हणाले, "बॉम्बस्फोट होणार आहे असे म्हणणाऱ्यांना विचारा तो केव्हा होईल. याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. मी काही स्फोट होणार आहे असे काही बोललो नव्हतोच. म्हणत अजित पवारांनी संजय राऊत यांना टोला लगावला."
माझ्याजवळ तीन भ्रष्टाचारी नेत्यांची माहिती...
माझ्याकडे जवळपास तीन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आली आहे. पण, विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका मांडताना ठोस पुरावे असावे लागतात. तेव्हा यासंदर्भात पुरावे मिळताच सर्वांपुढे मांडता येतील, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. सीमाप्रश्नावर बोलतांना पवार म्हणाले की, आज सीमाप्रश्नावर प्रस्ताव येणार असून त्याला संपूर्ण विरोधी पक्षाचे समर्थन असणार आहे. त्यात काही सूचना करण्याची गरज असल्यास त्यादेखील सांगण्यात येतील. सोबतच आमचा विरोधकांचा प्रस्ताव आज आहे. तो विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यावरदेखील चर्चा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
शिंदे गटाचे आमदार टार्गेटवर नाहीच...
शिंदे गटातील मंत्र्यांवर करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना पवार म्हणाले की, शिंदे गटातील मंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही. ज्या मंत्र्यांबद्दल माहिती मिळतेय त्यांच्याबद्दल बोलण्यात येत आहे. याचा अर्थ शिंदे गटातील मंत्र्यांनाच टार्गेट करण्यात येत आहे, असे होत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांविषयी आम्हाला सहानुभूती पण...
विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अनेकवेळा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. त्यांनी विधानसभेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मात्र, सत्तेत बसल्यावर विरोधकांनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत. देवेंद्रजी तुम्ही एवढे बदलले असे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस मनापासून भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचं काम करतील असं मला वाटत नाही. त्यांची काहीतरी मजबुरी असेल. त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती असल्याचेही राऊत म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :