नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना बाधित आढळल्यानंतर आता त्यांच्या टीम मधील अनेकजण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे ज्या महापालिकेच्या नेतृत्वात नागपूरकर कोरोनाशी लढा देत होते. त्याच महापालिकेभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होतोय की काय अशी भीती नागपूरकरांमध्ये निर्माण झाली आहे. आज आलेल्या चाचणी अहवालामध्ये महापालिकेतील आणखी 15 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.


महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कोरोना बाधित असल्याचे काल समोर आले होते. त्यांनी स्वतः काल सकाळी ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर महापालिकेतील सुमारे 90 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचे चाचणी अहवाल समोर आले असून महापालिकेतील मुख्यालयात काम करणारे 15 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी आणि क्रीडा विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह


अग्निशमन दलातील 14 जण कोरोना बाधित
याच्या पूर्वीही महापालिकेच्या अग्निशमन दलातील 14 जण कोरोना बाधित आढळले होते. त्या शिवाय महापालिकेच्या गांधीनगर झोन आणि लकडगंज झोन मधील काही अधिकारी व कर्मचारीही कोरोना बाधित झाले होते. मात्र, त्यांचे सर्वांचे कार्यालय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाहेर होते. आता मात्र कोरोनाचा शिरकाव महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झाला आहे. आधी महापालिका प्रशासनाचं नेतृत्व करणारे आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यानंतर आरोग्य आणि क्रीडा विभागातील 15 अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोना बाधित आढळल्याने महापालिकेसह नागपूरकरांची चिंता वाढली आहे.


'कोवॅक्सिन'ची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी निर्णायक वळणावर, लवकरच अंतिम निष्कर्ष जाहीर होणार


पोलीस आयुक्त कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव
दरम्यान, फक्त महापालिकेमध्येच कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तर नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे कोरोना बाधित आढळल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय ही 31 ऑगस्टपर्यंत सामान्य जनतेसाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अत्यंत महत्वाचे काम असल्यास फक्त पूर्व निर्धारित अपॉइंटमेंटनेच पोलीस आयुक्त कार्यालयात सामान्य जनतेला प्रवेश मिळणार आहे. जिल्हा परिषदेची मुख्य इमारतीत काम करणारे 18 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना संक्रमित आढल्यानंतर जिल्हा परिषद ही 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शेजारी असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत ही कोरोनाचा प्रवेश झाला असून या इमारतीतील अनेक कार्यालयांमधील कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहे.


त्यामुळे नागपुरात आता सामान्य नागपूरकरांसह प्रशासकीय यंत्रणा कोरोना बाधित होत असल्यामुळे कोरोना विरोधातला लढा दिवसागणिक जास्त कठीण होत आहे. काल नागपुरात 1 हजार 71 कोरोना बाधित आढळले असून आतापर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा 22 हजार 225 एवढा झाला आहे. दुर्दैवी म्हणजे काल एका दिवसात 52 नागपूरकरांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.


Tukaram Munde | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण