Nagpur News : गोविंदांना (Govinda) पाच टक्के आरक्षण (Reservation) देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री झाल्यावर असे भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन निर्णय जाहीर केल्याचं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आजपासून दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतील विभागातील पूरग्रस्त भागांची पाहणी तसंच प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्या निमित्ताने नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर अजित पवार बोलत होते.


'आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही'
दहीहंडी उत्सव आणि गोविंदांना आरक्षण देण्याबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं."उद्या दहीहंडी आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आपली भूमिका मांडणे, असं म्हणत अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. सोमवारी (22 ऑगस्ट) मी अधिवेशनात याबद्दल बोलणार आहे. गोविंदांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली, तेव्हा मी प्रश्न केले नाही. मात्र, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार? मुख्यमंत्री ज्या ठाण्याचं प्रतिनिधित्त्व करतात, तिथे गोविंदांची संख्या जास्त आहे. त्या गोविंदांना मला नाउमेद करायचं नाही, पण उद्या गोविंदाांना आरक्षण देऊन नोकरी देणार, मात्र जी मुलं-मुली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय याबद्दल भूमिका नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर असे भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. तिथे देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे. एकवेळ मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही. क्रीडा विभाग किंवा कोणाशी बोलले नाही. सर्वांशी बोलण्याची गरज असते, अशा शब्दात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 


अमरावतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिवेशनात बोलणार
दरम्यान अजित पवार आज अमरावतीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीमुळे विदर्भात आणि इतरत्र शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याबद्दल सोमवारी आपली भूमिका मांडणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. 


कुपोषण आणि बालमृत्यूचा मुद्दा अधिवेशनात उचलणार
अमरावती जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा मुद्दा अधिवेशनात उचलणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. "अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट, धारणी भागात कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. गेल्या महिन्याभरात 100 अशा घटना घडल्याची माहिती आहे. आज तिथे जाऊन आढावा घेऊ आणि सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार," असं अजित पवार म्हणाले.
 
उमरखेडमधील घटनाही अधिवेशनात उचलू
पालघरमध्ये एका भगिनिला प्रसुतीसाठी झोळीतून न्यावं लागलं, एकीला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असून अशावेळी अजूनही साध्या आरोग्य सेवा ना मिळणे दुर्दैवी घटना आहे. कोरोना काळात आरोग्य पायाभूत सेवा ठाकरे सरकारने उभारल्या, आता यवतमाळच्या उमरखेडमधील घटनाही अधिवेशनात उचलू, असं अजित पवार सांगितलं. आरोग्य केंद्राच्या दारावर महिलेची प्रसुती झाली, ज्यात तिच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला.


धमक्या गांभीर्याने घेतल्याच पाहिजे
अजित पवार यांनी यावेळी मुंबई वाहतूक कंट्रोल रुमला आलेल्या धमकीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. धमकीबाबत अजित पवार म्हणाले की, "अनेक वेळा अशा धमक्या येतात. अनिल अंबानींच्या कुटुंबाला धमकी आली होती. बऱ्याचदा माथेफिरु असे उद्योग करतात. तरीही अशा धमक्या गांभीर्याने घेतल्याच पाहिजे." 'राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा सक्षम आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी," असा सल्लाही अजित पवारांनी दिला.


संबंधित बातम्या