नागपूर : 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून नागपुरात सुरु होत आहे. आज  संध्याकाळी 6.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


नागपुरात तब्बल 35 वर्षांनंतर नाट्यसंमेलन होत असून नाट्यकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागपूरच्या प्रसिद्ध रेशीमबाग मैदानावर आणि त्याच्याच जवळ असलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

रेशीमबाग मैदानावरील मुख्य कार्यक्रम स्थळाला कै. राम गणेश गडकरी नाट्य नागरी परिसर असे नाव देण्यात आले आहे. तर उद्घाटन सोहळा ज्या मंचावर पार पडणार आहे त्या मंचाला कै. पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच असे नाव देण्यात आले आहे.

दुपारी 3 वाजता महाल परिसरातील शिवाजी पुतळ्यापासून नाट्य दिंडी काढली जाणार आहे तर संध्याकाळी उद्घाटनाचा सोहळा  होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या नाट्य संमेलनात अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग नियोजित असून नवोदित कलावंतांच्या एकांकिका  सादर केल्या जाणार आहे.

त्याशिवाय अनेक विषयांवर परिसंवाद होणार असून बाल नाट्य चळवळ आणि कलावंतांच्या समस्यांवर या विषयांवर खलबते होण्याची शक्यता आहे.