Nagpur News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी (nagpur to Shirdi)पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यानंतर नागपूर ते शिर्डी जाणाऱ्या साई भक्तांसाठी एसटी महामंडळाने दररोज विशेष बस सेवेची सुरुवात करण्याची घोषणा केली. त्यानुसार उद्या, 15 डिसेंबरपासून स्लीपर कोच बससेवा सुरू करण्यात येणार आहे.


ही विशेष बस नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक (Ganeshpeth Bus Stand Nagpur) येथून दररोज रात्री नऊ वाजता निघणार असून पहाटे साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचणार आहे. तसेच शिर्डी (Shirdi) येथूनही बस रात्री नऊ वाजता निघून पहाटे साडेपाच वाजता नागपुरात (Nagpur) दाखल होणार आहे. या बससेवेसाठी प्रति व्यक्ति 1300 रुपयांचे तिकीटदर ठरविण्यात आले असून लहान मुलांसाठी 670 इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलतही या बसमध्ये लागू असणार आहे. शिवाय 65 वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीट दरात 50 टक्के सवलतही लागू असणार आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनीही एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला तोंडी सूचना दिल्या असून लवकरच समृद्धी महामार्गावरील बस सेवेची पाहणी करणार असल्याचे सांगितले.


काय आहेत आरटीओच्या सूचना...


प्रवासी व साई भक्तांच्या सुरक्षेला घेऊन परिवहन विभागाने एसटी महामंडळ प्रशासनाला काही विशेष सूचना केल्या असून त्यावर काय उपाययोजना करत आहात याचा अहवाल देखील मागितलेला आहे. बस सेवा सुरू होण्याआधी चालक व वाहकांना समृद्धी महामार्गाची सविस्तर माहिती देणे, चालक व वाहकांना प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर घेऊन जाऊन त्यांना समृद्धी महामार्ग दाखवणे, समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियमासंदर्भात त्यांची विशेष कार्यशाळा घेणे, पाचशे वीस किलोमीटरचा थेट प्रवास असल्याने दोन चालक बसमध्ये ठेवणे अनिवार्य असणे, बसमध्ये प्रवाशांसाठी पाणी व खाद्यपदार्थाची व्यवस्था करणे, नैसर्गिक विधीसाठी निर्धारित थांब्यावर बस कशी थांबवायची याचे मार्गदर्शन करणे या सूचना परिवहन विभागाकडून एसटी महामंडळ प्रशासनाला करण्यात आल्या असून यासंदर्भात काय उपाययोजना केल्या याचा अहवाल देखील एसटी मंडळाला परिवहन विभागाकडे सादर करायचा आहे. या संदर्भात आपण सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असून प्रवाशांची सुरक्षितता हेच आपले प्राधान्य राहणार असल्याचे एसटी महामंडळ नागपूर विभागाचे नियंत्रक श्रीकांत गभने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.


जाणून घ्या विशेष नागपूर ते शिर्डी बस सेवेबद्दल...



  • या बसमध्ये प्रवाशांना 2X1 पध्दतीची 30 आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून 15 शयन आसने (Sleeper)आहेत.

  • बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 कि.मी. व वेळेमध्ये 4.15 तास बचत होणार आहे.

  • प्रति प्रौढ व्यक्ति 1300 रुपये व मुलांसाठी 670रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे.

  • 75 वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात 100% सवलत (मोफत प्रवास) तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50% सवलत असणार आहे.


समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर ते औरंगाबद सेवाही उद्यापासून...


याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10.00 वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे 05.30 वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.09 कि.मी. व प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे. सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति प्रौढ व्यक्तिसाठी 1100 रुपये व मुलांसाठी 575 इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु.945/- व मुलांसाठी रु.505/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येईल.


ही बातमी देखील वाचा


Nagpur Property : नागपुरात घर, जमीन विक्री उच्चांकावर; जमिनीचे भाव वाढले, फ्लॅटचे दर स्थिर