नागपूर : फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये आग लागून एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये ही घटना घडली. नूर महम्मद बोधर असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव असून ते 88 वर्षांचे होते.


काटोलमधील संचेती लेआऊटमध्ये आज (25 एप्रिल) पहाटे तीन वाजताच्या सुमारास सलीम फर्निचरमध्ये आग लागली. इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण आगीत 88 वर्षीय नूर महम्मद बोधर यांचा होरपळून मृत्यू झाला.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार फर्निचर तसंच लाकूड असल्याने दोन तास आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झाले होतं. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली.


या आगीत वर्कशॉपची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. फर्निचरचे दुकान इमारतीच्या तळमजल्यावर आहे, तर दुकान मालकाचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहतं.


काटोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव आचरेकर यांनी सांगितलं की, "दुकानाचे मालक नूर मोहम्मद हुसेन बदर अंथरुणाला खिळले होते. त्यामुळे त्यांना चालणंही अशक्य होतं. ते दुकानात झोपले होते आणि आग लागल्यानंतर धुरामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला." "अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली," असं त्यांनी सांगितलं.


या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. आगीचे कारण अद्याप समजू शकलं नाही.


इतर बातम्या