Anganwadi worker Nagpur : राज्यात लवकरच सुमारे 30,400 अंगणवाडी सेविकांची भरती केली जाणार आहे. यापदासाठी पूर्वी 10 वी उत्तीर्ण असल्याची अट होती. आता मात्र 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेविका आणि मदतनिसांच्या अंतिम निवडीचे अधिकार तालुका स्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आठवडाभरात भरती प्रक्रिया सुरू होईल. नागपूर जिल्ह्यात (Nagpur) सध्या 2423 अंगणवाड्या असून 172 नवीन अंगणवाड्या प्रस्तावित आहेत. सध्या असलेल्या अंगणवाड्यांमध्ये सेवकांची 120 तसेच मदतनीसांची 229 पदे रिक्त आहेत.


एक ते सहा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी, मुळाक्षरे आणि अंकांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रत्येक गावात अंगणवाडी चालवली जाते. राज्यात 1 लाख 10 हजार अंगणवाड्या आहेत. आणखी काही अंगणवाड्या सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, या अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने 9 जानेवारीला नवीन पद भरतीला मान्यता दिली. केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेविकांची शैक्षणिक पात्रता 10 वी ऐवजी 12 वी उत्तीर्ण करण्यात आली होती. यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लगेच भरती सुरू होईल. पुढील आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज करू शकतील. अर्जांची छाननी केल्यानंतर, पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.



  • नागपूर जिल्ह्यात 2,423 अंगणवाड्या

  • 120 सेविकांची पदे रिक्त

  • 229 मदतनीसांची पदे रिकामी

  • 172 नवीन अंगणवाड्यांचा प्रस्ताव 


मदतनिसांना मिळेल पदोन्नती


भरती प्रक्रियेपूर्वी मदतनिसांना सेविकापदी बढती देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने यादीही तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात 120 अंगणवाडी सेविका आणि 229 सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. एकात्मिक बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्ह्यात 2,423 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 2,131 मोठ्या आणि 262 लहान अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीसाठी गावाची लोकसंख्या 800 ते 1,000 असणे आवश्यक आहे. बालकांची काळजी घेण्यासाठी गावोगावी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती केली जाते, मात्र जिल्ह्यात मोठ्या अंगणवाड्यांमध्ये सेविकांची 113 तर लहान अंगणवाड्यांमध्ये 7 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर मदतनिसांची 229 पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात 172 नवीन अंगणवाड्यांची गरज असल्याचे समोर आले. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडून प्राप्त झाली आहे.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur Mumbai Flight : नागपूर-मुंबई रात्रीची विमानसेवा लवकरच सुरू; 18 मार्चपासून सुरु होणार एअर इंडियाची सेवा