Nagpur News : नागपुरातील तरुणाईमध्ये हुक्का ओढण्याची क्रेझ वाढली असून महाविद्यालय ऑफलाईन सुरु झाल्यावर शहरातील पॉश एरियामधील अनेक कॅफेमध्ये अवैधरित्या हुक्का पुरवण्यात येत आहे. मात्र अशा अवैध हुक्का पार्लरपैकी सीताबर्डी आणि अंबाझरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तीन हुक्का पार्लरवर नागपूर पोलिसांनी छापे टाकले आहे. या कारवाईमुळे हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 


पोलिसांची पाठ वळताच परत हे हुक्का पार्लर सुरू होतात. त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही कारवाई रामनगर चौकातील 'स्मोक ॲण्ड हुक्का पार्लर', लॉ कॉलेज चौकातील 'डब्ल्यूटीएफ कॅफे अॅण्ड लाउंज' आणि शंकर नगर चौक, अंबाझरी येथील 'क्लाउड कॅफे' या ठिकाणी ग्राहकांना बंदी असलेला तंबाखू पुरवला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे जाऊन धाड टाकली असता तेथे ग्राहक आढळून आले.


पोलिसांनी हुक्का पॉट, तंबाखू आदी जप्त केले. अंबाझरी, सीताबर्डी, सदर, बजाज नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक हुक्का पार्लर चालतात. पोलिसांकडून दाखविण्यासाठी अनेकदा कारवाई होते. मात्र, कारवाई झाली आणि नावापुरती जप्ती झाली की 24 तासांत परत हुक्का पार्लर सुरू होतात. धरमपेठेतील एका हुक्का पार्लरवर तर तीनदा धाड पडली होती. तरीदेखील तो सुरूच होता. तीनही हुक्का पार्लर चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


धरमपेठमधील आगीची घटना दडपली?




शहरात अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत चालणारे कॅफे आणि हुक्का पार्लर आहेत. मात्र याकडे पोलिस विभागाकडून 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे.  विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी रात्री 2-3 पर्यंत दररोज तरुण-तरुणी हुक्का ओढण्यासाठी येतात. या हुक्का पार्लरकडून परिसरात सीसीटीव्हीही लावण्यात आले आहे. त्याद्वारे येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजरही ठेवण्यात येते. 2 फेब्रुवारी 2023 रोजी शंकरनगर चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हुक्का पार्लरमध्ये पहाटे पाचच्या सुमारास आग लागली होती. धूर दिसल्यावर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तसेच सकाळी साडेनऊ ते दहा दरम्यान पोलिसांचे पथकही पोहोचले.मात्र पोलिसांकडून पंचनाम्यात हुक्का पॉट किंवा त्याचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही, हे विशेष. शिवाय अग्नीशमन विभागाकडूनही या माहितीबद्दल कुठलीही माहिती जारी करण्यात आली नाही, हे विशेष.


ही बातमी देखील वाचा...


जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली एनए, टीपी नसलेल्या नोंदणी केलेल्या दस्तांची माहिती; रजिस्ट्र्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ