Nagpur Mumbai Flight : मागील सात महिन्यांपासून बंद असलेल्या एअर इंडियाच्या रात्रीच्या नागपूर-मुंबई विमानसेवेमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मुंबईला कामासाठी गेल्यावर रात्री उशीर झाल्यास त्यांना मुक्काम करावा लागत होता. मात्र आता पुन्हा एकदा नागपूर (Nagpur) मुंबई रात्रीची विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला (Mumbai) पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा 18 मार्चपासून सुरू होणार आहे.
एआय 629 हे विमान रात्री 7:15 मुंबईहून रवाना होऊन 8:35 पर्यंत नागपुरात पोहोचेल आणि एआय-630 हे विमान नागपुरातून रात्री 9:20 वाजता रवाना होऊन मुंबईला 10:20 वाजता पोहोचेल. कंपनीने या विमानाचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार विमानसेवा 25 मार्चपर्यंत दरदिवशी दर्शवण्यात आली आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार ही सेवा पुढे नियमित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षीपासून बंद झालेली दिल्लीची सेवा अद्याप बंदच
गेल्या वर्षी एअर इंडियाची दिल्ली विमानसेवा सुरु होती. ही सेवा बंद झाल्यानंतर पुन्हा सुरु झालीच नाही. दिल्ली विमानासह मुंबईची रात्रीची विमान सेवा बंद केली होती. सध्या केवळ सकाळची मुंबईची विमानसेवा सुरू केली आहे. तर 18 मार्चपासून रात्रीचे उड्डाण सुरु होणार आहे.
नागपूर-नाशिक विमानसेवाही लवकरच; इंडिगोचा डीजीसीएकडे प्रस्ताव
राज्यातील नागपूर आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सने व्यक्त केला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) पाठविला आहे. डीजीसीएने इंडिगोला या विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून दिल्यास येत्या 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या समर शेड्युलपासून नागपूर-नाशिक भरणार आहे. विमान उड्डाण ऑरेंजसिटी, ग्रीनसिटी, टायगर कॅपिटल अशी ओळख असलेले नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती जागेवर असलेले शहर तर वाइन कॅपिटल, पायाभूत सुविधांचा मोठा विकास झालेले ऐतिहासिक-सांस्कृतिक शहर म्हणून नाशिक ओळखले जाते. दोन्ही शहरे राज्यातील दोन प्रदेशांचे अस्तित्व ठसठशीतपणे अधोरेखित करतात. खऱ्या अर्थाने ही दोन्ही शहरे अर्बन सेंटर्स आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर-नाशिक ही विमानसेवा सुरू होणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.
...तर 15 मार्चपासून सेवेला सुरुवात
यासंदर्भात अधिक सांगताना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, 'इंडिगो एअरलाइन्सने नागपूर-नाशिक विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. तो प्रस्ताव पुढील आठवड्यात डीजीसीएपुढे मांडण्यात येईल. संबंधित विमानसेवेची योग्यता, गरज तपासून डीजीसीए स्लॉट उपलब्ध करून देणार आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यास 15 मार्चपासून ही सेवा सुरू होऊ शकेल.' या विमानसेवेसाठी एटीआर 72-600 या विमानांचा वापर करण्यात येणार आहे. आज घडीला हे विमान जगभरातील 39 एअरलाइन्सच्या ताफ्यात आहे. या विमानाची आसनक्षमता 78 इतकी असेल.
औरंगाबादचे स्वप्न अपूर्णच
विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे म्हणून नागपूर आणि औरंगाबादकडे पाहण्यात येते. त्यादृष्टीने या दोन्ही शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा साधारणपणे वर्ष-दीड वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. परंतु ही विमानसेवा आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचे लक्षात आल्याने सुरू होऊ शकली नाही.
ही बातमी देखील वाचा...