यावेळी ठाकरे म्हणाले की, भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल उचलत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटींची गरज असल्याच्या मुद्याचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या 23 हजार कोटींच्या मदतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही जणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे ही वाचा - शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यावेळी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार का? या प्रश्नावर ठाकरे यांनी नाव देणार का? नाही तर नाव दिलं असं म्हणतं या नामकरणावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात जर कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, या प्रकरणात जो कोणी जबाबदारी असेल त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी विरोधकांच्या 'स्थगिती सरकार' च्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे. रात्रीतून तेथे वृक्षतोड करून सजीवसृष्टी नष्ट करण्यात आल्यानं स्थगिती दिलेली आहे. सरकारने कोणत्या कामांना स्थगिती दिली त्याची यादी त्यांनी द्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.