नागपूरः विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ तेलंगणा येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्ण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडीकल) येथे रेफर केले जातात. रोजची ओपीडी 2500 ते 3000च्या घरात आहे. मात्र याच ठिकाणी मेडिकलच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस पसरला असून एकाच दिवशी दोन डॉक्टरांवर हल्ला करीत पाय आणि हाताचे लचके तोडल्याची भयंकर घटना मेडिकल परिसरात घडली. जे डॉक्टर इतरांचा जीव वाचविण्यासाठी तत्पर असतात त्यांनाही वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे कुत्री चावल्यावर या डॉक्टरांना मेडिकलमध्ये इंजेक्शनही मिळू शकले नाही. कुत्र्यांचे दात खोलवर घुसल्याने दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.
पत्र देऊनही मनपाचे दुर्लक्ष
शेकडो निवासी डॉक्टर रुग्ण सेवेच्या कर्तव्यावर असतात. या डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी शेकडो सुरक्षा रक्षक आहेत. हे रक्षक माणसांपासून वाचवू शकतात पण मोकाट कुत्र्यांपासून कोण वाचवणार? मेडिकल परिसरात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार नागपूर महानगरपालिकेला स्मरण पत्र देऊनही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक येत नाही.
इंजेक्शनचीही उपलब्धता नाही
मेडीकलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून त्यांचे नातेवाईकही परिसरातच झाडाच्या खाली, आणि मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर असतात. तर अनेक भरती रुग्णांचे नातेवाईक झोपतातही त्यामुळे अशा घटना रोजच्याच असल्याचे व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले. मेडिकलमधील दोन डॉक्टरांचा चावा रविवारी सायंकाळी कुत्र्यांनी घेतला. यातील एक निवासी तर एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे. कुत्र्यांचा हल्ला एवढा भयंकर होता की हात आणि पायावर खोलवर जखमा झाल्या. नखांनी ओरबाडले. भयभीत झालेल्या डॉक्टरांनी कॅज्युल्टी गाठली पण धक्कादायक बाब म्हणजे येथे इंजेक्शन उपलब्ध नव्हते. डॉक्टरांनी पैसे गोळा करून इंजेक्शन बोलावले, यानंतर उपचार करण्यात आल्याची माहिती पुढेल आली आहे.
Admission Scam : एमबीबीएस प्रवेशाच्या नावावर 26.52 लाखांचा गंडा
पंधरा दिवसात चार डॉक्टरांना चावा
या पंधरा दिवसात चार डॉक्टरांना चावा घेतल्याची माहिती मेडिकलच्या मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांनी दिली. या संदर्भात मेडिकल प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु, निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे प्रशानस दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार मार्डतर्फे करण्यात आली. दोन्ही डॉक्टरांना सध्या मेडिकलमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.