नागपूरः एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर एका कुटुंबाची 26 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गोपाल हरीशचंद्र पराते (59) रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, ओमकारनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. कामरान खान, मयंक अग्रवाल, राकेश पाटील आणि आशीष जयस्वाल सर्व रा. मुंबई अशी आरोपींची नावे आहेत.
25 लाख रुपये डोनेशन मागितले
पराते हे एचपीसीएलमध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांची मुलगी मोनिका हिने नीट (NEET) उत्तीर्ण केले होते आणि तिला एमबीबीएसला प्रवेश पाहिजे होता. संपूर्ण कुटुंब तिला प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करीत होते. गत 10 मार्चला कामरानने पराते यांना फोन करून मोनिकाला बंगळुरूच्या मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) प्रवेश मिळवून देण्याची थाप मारली. मात्र पराते यांनी केवळ महाराष्ट्रातील महाविद्यालयातच प्रवेश पाहिजे असल्याचे सांगितले. काही वेळाने आरोपीने पुन्हा फोन केला आणि मुंबईच्या परेल येथील सेठ जी.एस.मेडिकल कॉलेज व रुग्णालयात प्रवेश मिळू शकते अशी माहिती दिली. पराते तयार झाले. त्यांना मुंबईला भेटण्यासाठी बोलावण्यात आले.
पराते व त्यांची पत्नी मुंबईला गेले. कामरानने व्यस्त असल्याचा बहाणा करून राकेश पाटील नावाच्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितले. त्यांनी राकेशला फोन केला. राकेशने महाविद्यालयाच्या नावाने 1.12 लाख रुपयांचा डीडी बनविण्यास सांगितले. डीडी बनविल्यानंतर पराते पुन्हा मुंबईला गेले. कामरानने तो डीडी महाविद्यालयाच्या प्रशासकीय विभागाचे अधिकारी मयंक अग्रवाल यांना देण्यास सांगितले. तेथे त्यांची मयंकशी भेट झाली. डीडी घेतल्यानंतर मयंकने प्रवेशासाठी 25 लाख रुपये डोनेशन द्यावे लागेल असे सांगितले.
RTMNU : नव्या सत्रापासून नागपूर विद्यापीठात नवा अभ्यासक्रम
प्रोव्हीजनल लेटर निघाले बनावट
पराते यांनी जुळवा-जुळव करून 15 लाख रुपयांची व्यवस्था केली आणि 26 मार्चला मुंबईला पोहोचले. तेथे मयंक आणि राकेशने त्यांच्याकडे पैसे घेतले. 5 एप्रिलला मोनिकाच्या ईमेलवर प्रोव्हीजनल अॅडमिशन लेटर पाठविण्यात आले. त्यानंतर मयंकने उर्वरित 10 लाख रुपये घेऊन मुंबईला बोलावले. परातेंना मुंबईला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे आरोपीने त्यांना दिल्लीच्या यस बँकेत आशीष जयस्वालच्या खात्यात आरटीजीएस करण्यास सांगितले. पराते यांनी जयस्वालच्या खात्यात पैसे आरटीजीएस केले. प्रोव्हीजनल लेटरमध्ये 18 एप्रिलला महाविद्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. पराते मुलीसह मुंबईला पोहोचले मात्र राकेश आणि मयंक त्यांना भेटायला आले नाही. कॉलेजच्या अधिष्ठ्यांची भेट घेऊन विचारपूस केली असता प्रोव्हीजनल लेटर बनावट असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी प्रवेशाच्या नावावर पराते यांनी एकूण 26.52 लाख रुपयांनी फसवणूक केली होती. पोलिसांनी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI