नागपूर : नागपुरात क्रौर्याची परिसीमा गाठणारी एक घटना उघडकीस आली आहे. भंडारा रोडवरील एका औद्योगिक वसाहतीतील सूतगिरणीमध्ये काम करणाऱ्या एका 19 वर्षीय महिला कामगारावर तिथल्याच पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला हेतू साध्य करण्यासाठी या नराधमाने पीडितेला एकटे पाहून आधी तिच्यावर गुंगीच्या स्प्रेचा वापर करून तिला बेशुद्ध केले आणि बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात धातूची वस्तू टाकून तिला जखमी केले. पोलिसांनी या प्रकरणी योगीराज रहांगडाले या आरोपी पर्यवेक्षकाला अटक केली आहे.


नागपूरच्या एका औद्योगिकी वसाहतीत असलेल्या सूत गिरणीतील 19 वर्षीय महिला कामगारासोबत बलात्काराची घटना घडली आहे. सूत गिरणीला लागूनच असलेल्या कामगारांच्या इमारतीत 21 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार 21 जानेवारीच्या रात्री तिच्यासोबत खोलीत राहणारी तिची मैत्रीण आणि भाऊ बाहेरगावी गेलेले होते. त्याचाच फायदा घेत सूतगिरणीत पर्यवेक्षक असलेल्या योगीराज रहांगडालेने तिच्या खोलीत प्रवेश केला. काही समजण्याच्या आधीच त्याने गुंगीचा स्प्रे तोंडावर मारल्याने तीव्र वास येऊन पीडिता बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर स्वतःच्या शरीराची अवस्था, होणाऱ्या असह्य वेदना आणि शरीरातून होणाऱ्या रक्तस्रावामुळे तिला सोबत घडलेल्या प्रकाराची जाणीव झाली.

वेदनेमुळे तिने किंचाळताच शेजारी राहणाऱ्या कामगारांनी तिकडे धाव घेतली आणि पीडितेची अवस्था पाहून तिला रुग्णालयात नेले. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पीडितेने काल पारडी पोलीस स्टेशन गाठून घटनेची रीतसर तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करून आरोपी पर्यवेक्षक योगीराज रहांगडाले विरोधात गुंगीचे स्प्रे वापरून बेशुद्ध करणे आणि बलात्कार करणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पर्यवेक्षक योगीराज रहांगडालेला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. एबीपी माझाने या प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेला दुजोरा दिला. मात्र, कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दरम्यान, शहरात दर दोन दिवसांनी हत्येच्या घटना सुरूच असून गेल्या चारपाच दिवसात नागपुरात रोजच महिलांच्या सोनसाखळ्या पळवण्याची प्रकरणंही समोर येत आहे. त्यामुळे क्राईम कॅपिटल नागपुरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी हैदोस मांडल्याचे चित्र आहे.