नागपूर : व्यसनांना नाही म्हणाया शिका, अन्यथा व्यसनाद्वारे जगातल्या सर्व वाईट मार्गांचा अवलंब करायला भाग पाडणार. त्यासाठी आजच शपथ घ्या, अमली पदार्थाला नाही म्हणा. 'से नो टू ड्रग्स ', अशी शपथ घ्या, असे आवाहन नागपूरच्या सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी आज हजारोच्या संख्येने उपस्थित तरुणाई पुढे केले. नुकत्याच झालेल्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्त नागपूर पोलीस विभागाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने विविध ठिकाणी अमली पदार्थ विरोधी अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शहरातील महाविद्यालयात प्रत्यक्ष कार्यशाळा, वेब चर्चा, कॉलेजमध्ये परिसंवाद, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.  प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये यासाठी विशेष समिती तयार करण्यात आली असून अमली पदार्थ विरोधी वाढत्या कारवाईने नागपूरमध्ये या अभियानाचा धडाका सुरू आहे.


आज यासंदर्भात नॅशनल फायर कॉलेज येथे हजारोच्या संख्येने तरुणाई एकवटली होती. या तरुणाई पुढे अमली पदार्थ विरोधी लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच यावेळी 'व्यसनाधीनता व त्यातून होणारी हेडसांड' या संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, या अभियानाचे आयोजक तथा उपायुक्त गुन्हे शाखा चिन्मय पंडित, अमली पदार्थ विरोधी मार्गदर्शक अभिजीत सेन गुप्ता, मनोज चिकित्सक व कौन्सिलर श्रेयश मंगिया आदी उपस्थित होते. यावेळी अश्वती दोरजे यांनी कोणत्याच दबावाखाली किंवा आपण एकटे पडण्याच्या भीतीने ड्रग्सला होकार देऊ नका. एकदा का तुम्ही होकार दिला मग शरीराला सवय होते व त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही, असे अनेक दाखले देत युवकांना समजावून सांगितले.


या अभियानाचे आयोजक उपायुक्त गुन्हे शाखा चिन्मय पंडित यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. त्यानंतर अभिजीत सिंग गुप्ता व डॉक्टर श्रेयस मंगीया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थाचे दुष्परिणाम त्यातून बाहेर पडण्याची जिद्द त्यासाठी करावयाची उपाययोजना याबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले . या कार्यक्रमांमध्ये शिवाजी सायन्स, तुली, अंजुमन , इस्लामिया, एस एफ एस, मॉडर्न हायस्कूल ,बी.के. व्ही कॉलेज, दयानंद आर्य, कन्या कॉलेज, तिडके कॉलेज, महात्मा गांधी, कॉलेज रामदेव बाबा ,राजकुमार केवल, माने कॉलेज असे एकूण बारा कॉलेज व त्यातील एकूण 1000 विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तसेच ऑनलाइन हजारोंच्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली वडोदकर यांनी केले.