Ananya : प्रेक्षकांना येत्या रविवारी एक खास कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल' (Hou De Charcha Ananya Special) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. 'अनन्या' सिनेमाचा संपूर्ण चमू या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. दरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.
'अनन्या' या सिनेमाची पहिल्या पोस्टरपासून चर्चा आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि लेखन आपल्या खुमासदार शैलीत समीर चौघुले यांनी केले असून वनिता खरात, प्रभाकर मोरे, शिवाली परब, गौरव मोरे, चेतना भट, ओंकार भोजने हे कलाकार गावकऱ्यांच्या भूमिकेत धमाल उडवणार आहेत.
'अनन्या' सिनेमातील हृता दुर्गुळे, अमेय वाघ, सुरत जोशी, ऋचा आपटे, चेतन चिटणीस, योगेश सोमण हे कलाकार आणि या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक प्रताप फड, निर्माते रवी जाधव, संजय छाब्रिया, ध्रुव दास उपस्थित राहणार आहेत. 'अनन्या' एकांकिकेपासून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सिनेमाच्या टीमने उलगडून सांगितली.
हास्यवीरांचे विनोद कार्यक्रमाला हास्याचे रंग चढवणार
'अनन्या' घडताना हृताने घेतलेली खास मेहनत, तिची या भूमिकेसाठी झालेली निवड, तिच्या आईबाबांच्या प्रतिक्रिया, चित्रीकरणादरम्याचे किस्से अशा सगळ्या गोष्टींनी हा कार्यक्रम उत्कंठावर्धक होणार आहे. त्याचबरोबर हृताला एक गोड सरप्राईझ या कार्यक्रमात मिळणार आहे. इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेबद्दल आणि प्रवासाबद्दल अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि सहकारी यांचा नृत्याविष्कारही या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. चेतना भट हीसुद्धा आपल्या मोहक अदांनी घायाळ करणार आहे. हास्यवीरांचे विनोद कार्यक्रमाला हास्याचे रंग चढवणार आहे.
होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल
कुठे पाहायला मिळेल? रविवारी संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठी वाहिनीवर
संबंधित बातम्या