नागपूरः आर्थिक तंगीमुळे शहरातील एका व्यावसायिकाने कारमध्ये स्वतःसह पत्नी व मुलावर ज्वनशील पदार्थ ओतून आग लावून घेतली होती. या प्रकरणात आता मुलगा नंदन भट याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यासोबतच अख्खे भट कुटूंबच संपले आहे. या घटनेमुळे अनेकांचे हृदय हेलावले. ही घटना वर्धा मार्गावरील खापरी पुनर्वसन परिसरात घडली होती. गेल्या 19 जुलै रोजी व्यावसायिक रामराज भट (वय 63) रा. शिवप्रिया टॉवर, जयताळा यांनी कारमध्ये स्वतःच्या कुटुंबासह पेटवून घेतले होते. यात रामराजचा घटनास्थळीच जळून कोळसा झाला होता.


मात्र त्यांची पत्नी संगीता (वय 57) आणि मुलगा नंदन (वय 25) गंभीररीत्या होरपळले होते. सुरुवातीपासूनच दोघांचीही प्रकृती चिंताजनक होती. संगीता तर बेशुद्धच होत्या. रविवारी सकाळी त्यांनी प्राण त्यागले, मात्र नंदनची प्रकृती स्थिर होती. तो 63 टक्के जळाला होता. मात्र जखमा खोलवर होत्या. या दरम्यान पोलिसांनी नंदनची जबानी घेतली. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला. आता भट कुटुंबात कोणीही उरले नाही. आर्थिक संकटामुळे अख्खे कुटुंब उद्धवस्त झाले.


आईच्या मृत्यूचा जबर धक्का


पेटत्या कारमध्ये डोळ्यादेखत वडिलांचा कोळसा झालेला नंदनने पाहिले होते. तर आई गंभीर जखमी झाली. याचा जबर मानसिक धक्का त्याला बसला. त्यातच आईनेही जग सोडल्याचे समजताच तो प्रचंड निराश झाला. आता जगायचे तरी कुणाच्या आधाराने अशा विचाराने तो खचला आणि जगण्याची आशाच सोडली. त्याची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी नंदननेही जगाचा निरोप घेतला. त्याला ह्रदयविकाराचा जोराचा झटका आला होता.


आर्थिक तंगीतून सामूहिक आत्महत्येचा विचार
 
रामराज भट यांचं नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे भट आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 


औषध म्हणून विष देण्याचा प्रयत्न


वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने भट पत्नी आणि मुलाला घेऊन कारमधून निघाले. दुपारी जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं. परंतु पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.