मुंबई: वेगवेगळ्या पक्षांशी युती केल्यामुळेच भाजपनं राज्यातल्या सर्वात जास्त नगरपालिका जिंकल्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.


शिवसेनेच्या 25 नगराध्यक्षांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

आम्ही निवडणुकीचा प्रचार करताना कुठलीही आमिषं दाखवली नाहीत, असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट केलं.

मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रचारांमध्ये  भाजपला साथ द्या, आम्ही शहर दत्तक घेऊ असं म्हटलं होतं.

मात्र यावेळी बोलताना विदर्भ आणि काही भागामध्ये शिवसेनेची ताकद कमी पडली. तिथं यापुढं आपण जातीनं लक्ष घालणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मात्र मुंबईसह 10 पालिकांमध्ये युती होणार का? यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

- तमाम शिवसैनिकांना विजयाचं श्रेय देतो.

- मी एकही सभा घेतली नाही कारण मला दाखवून द्यायचं होतं की सच्चा शिवसैनिकाची ताकद काय असते.

- जनतेला सुद्धा धन्यवाद कारण आमच्याकडून आश्वसनांची खैरात केली गेली नव्हती, किंबहुना खोटी आश्वासनं दिली गेली नव्हती, तरी आम्हाला भरघोस यश आमच्या पदरात टाकलं.

- युतीचा विषय माझा नाही, तुम्हाला माहिती आहे कोणाची कुठे कुठे युती झाली होती ते.

- शिवसेनेची युती फक्त आणि फक्त भाजपशी झाली होती. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्थानिक आघाड्यांशी झाली असेल, त्यापेक्षा अन्य कोणत्याही पक्षांशी शिवसेनेची युती नव्हती.

- महापालिकेत भाजप नंबर एकचा पक्ष राहील असं मुख्यमंत्री म्हणाले त्यावर त्यांना माझ्या शुभेच्छा असं सूचक उद्धव यांनी केलं

- विदर्भामध्ये आम्ही कमजोर आहोत, तिथे मी जातीने लक्ष घालेन.

- शिवसैनिकांनी कमाल केली

- भाजपला जास्तीत जास्त यश विदर्भातून मिळालं आहे. उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेचे 25 ते 26 नगराध्यक्ष आलेत. तर विदर्भात 5 नगराध्यक्ष आलेत. मात्र विदर्भात आमचं दुर्लक्ष झालेत हे खरंय

- प्रत्येक ठिकाणी भाजपच्या वेगवेगळ्या पक्षांशी युती केलीय त्यामुळे भाजपला यश.