मुंबई : एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन आणि पाच उत्तेजनार्थ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात बक्षीस वितरण केलं जाईल. यंदा ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेसाठी जवळपास 150 ब्लॉगर्सच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून सर्वोत्कृष्ट 3 आणि उत्तेजनार्थ 5 विजेत्यांची निवड करणं अत्यंत कठीण काम होतं. कारण प्रत्येक ब्लॉग वेगळ्या विषयावरील आणि वेगळ्या धाटणीचा होता. मात्र, ब्लॉग माझा स्पर्धेच्या परीक्षक या नात्याने लेखिका कविता महाजन यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. फेसबुक, ट्विटरमुळे असं वाटलं होतं की, ब्लॉगिंग आणि त्यातही मराठी ब्लॉगिंगचं काय होणार? मात्र ही माध्यमं ब्लॉगिंगला पूरकच ठरत आहेत. मराठी ब्लॉगिंगचं क्षितिजही विस्तारत आहे. मराठी ब्लॉगर्स विविध विषयांना धीटपणे भिडत आहेत. अशाच मराठी ब्लॉगर्सचं कौतुक करण्याचं एबीपी माझाने ठरवलं आणि त्यातूनच ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेची सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच ब्लॉग माझा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाही महाराष्ट्रासह देश-विदेशातून ब्लॉगर्सच्या प्रवेशिका आल्या होत्या. यावरुनच या स्पर्धेची व्याप्ती दिसून येते.
विजेते ब्लॉगर्स आणि ब्लॉगची लिंक : परीक्षक कविता महाजन यांचं निरीक्षण : ब्लॉगचा विषय, आशय, भाषा, मांडणी आणि लेखनातील सातत्य या पाच निकषांवर विचार करून ही निवड करण्यात आलेली आहे. समीर गायकवाड यांचा ब्लॉग स्वतंत्र विचार मांडणारा आणि सोबतच छायाचित्रांसह माहिती देणाराही आहे. त्यांनी अनेक विषयांवर सातत्यपूर्ण रीतीने लेखन केले आहे. वैभव छाया यांचे लेखन ठरावीक विषयांवर असले तरी सामाजिक भान, प्रामाणिक व निर्भीड मते त्यात आढळतात. मांडणीचाही विचार त्यांनी केलेला दिसतो. सतीश कुडतरकर यांचा ब्लॉग एका विषयाला वाहून घेतलेला असला तरी त्या विषयाच्या खोलात नेणारा आहे. भाषा आणि मांडणी या दोन्ही निकषांवर तो चांगला ठरतो. एकूण सर्व ब्लॉग पाहता त्यात विषयांचे वैविध्य खूपच कमी आढळले. राजकारण, क्रीडा, माहिती, खानपान, कला, संस्कृती, शिक्षण, धर्म, इतिहास इत्यादी शेकडो विषयांमधल्या मोजक्याच विषयांना या लेखकांनी स्पर्श केलेला दिसतो आणि अनेक विषयांवरचे लेखन इथे अजिबातच आढळले नाही, ही मर्यादा जाणवली. मांडणीची समज देखील अजून विस्तारित व्हायला हवी, असे म्हणता येईल. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
एबीपी माझाकडून सर्व विजेत्या ब्लॉगर्सचं अभिनंदन !!!