मुंबई: टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ गेल्या अनेक वर्षापासून अजिबात चर्चेत नाही. पण 'मोहम्मद कैफ' हे नाव बरंच चर्चेत आहे. पण हे नाव एका शार्प शूटरचं आहे. यालाच वैतागून आज मोहम्मद कैफनं थेट ट्वीटरवरुन आपला राग व्यक्त केला आहे. 'माझं नाव मोहम्मद कैफ आहे आणि मी शार्प शूटर नाही.'

पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून शार्प शूटर मोहम्मद कैफचं नाव समोर आलं होतं. मोहम्मद शहाबुद्दीन जेलमधून बाहेर आल्यानंतर गुंड मोहम्मद कैफ त्याच्यासोबत दिसून आला होता. त्यानंतर या नावाची चर्चा सुरु झाली.

इतकंच नव्हे तर शार्प शूटर मोहम्मद कैफ हा आरजेडी पक्ष प्रमुखांचा मुलगा तेजप्रताप यांच्यादेखील भेटीला गेल्याची चर्चा आहे. तसंच भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वीसोबतही तो दिसल्याची चर्चा आहे.


पण मोहम्मद कैफच्या या चर्चेमुळे टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि सध्याच्या छत्तीसगड संघाचा कर्णधार मोहम्मद कैफ मात्र चांगलाच त्रस्त झाला आङे. शार्प शूटर समजून अनेक जण या भारतीय फलंदाजाला त्रास देत आहेत. या गोष्टींना वैतागून मोहम्मद कैफनं ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर करुन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मोहम्मद कैफची ट्विटर पोस्ट: 'माझं नाव मोहम्मद कैफ आहे पण मी शार्प शूटर नाही. मला आणि माझ्या कुटुंबीयांना अनेक फोन कॉल येत आहेत. मी फक्त क्रिकेट खेळतो.'
यानंतर कैफ म्हणतो की, 'मागील काही दिवसांपासून शार्प शूटींगच्या एका केसमध्ये मोहम्मद कैफच्या नावानं बातम्या समोर येत आहे. कुण्या एका पत्रकारानं माझ्या भावाला फोन करुन विचारलं की, कैफ भाईनं हे काय केलं? असंच एका एजन्सीनंही केलं की, त्यांनी माझा फोटो लावून त्यावर लिहलं होतं की, कैफ भाई को इन्साफ दो!'
'मला कोणताही न्याय नको. माझं नाव मोहम्मद कैफ आहे आणि मी शार्प शूटर नाही. मी बंदुकीतून गोळ्या नाही चालवत तर फक्त बॉलनं स्टंप हिट करतो. यापुढे येणाऱ्या सामन्यांमध्येही तसंच करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, पण कृपा करुन अफवा पसरवू नका. कारण की, प्रत्येक मोहम्मद कैफ हा क्रिकेटर नसतो.