कल्याण : युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने एका बिल्डरला 50 लाखांच्या खंडणीसाठी मारहाण केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. डोंबिवलीत राहणारे बांधकाम व्यावसायिक हितेश पटेल यांचं अंबरनाथच्या चिखलोली परिसरात बांधकाम सुरू आहे.


या बांधकामाच्या मोबदल्यात युवा सेनेचा पदाधिकारी शैलेश भोईर आपल्याकडे खंडणी मागत असल्याचा पटेल यांचा आरोप आहे. यातूनच शैलेश भोईर हा सोमवारी दुपारी त्याच्या काही साथीदारांना घेऊन पटेल यांच्या बांधकामाच्या ठिकाणी आला आणि पटेल यांना खाली पाडून अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.


मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शैलेश भोईर आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून यानंतर भोईर फरार झाला आहे.


दरम्यान, भोईर हा अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात अशाचप्रकारे दहशत माजवत अनेक बिल्डरांना त्रास देत असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्याची मागणी बिल्डर करत आहेत.