नवी मुंबई : बावखळेश्वर मंदिरावर एमआयडीसीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीची कारवाई राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांना मोठा धक्का असल्याचं मानला जात आहे. गणेश नाईक यांनी नातेवाईकांना पुढे करीत ट्रस्ट तयार करून एमआयडीसीच्या 33 एकर जागेवर भव्य मंदिर उभारले आहे.
गणपती, शिवशंकर आणि भवानी माता अशी तीन अलिशान मंदिरे या ठिकाणी बांधण्यात आली आहेत. याशिवाय तलाव, उद्यानही उभारण्यात आलं. आज दुपारी एमआयडीसीने मंदिरावर कारवाई करण्यास सुरवात केली. कारवाईच्या आधी या ठिकाणी असलेल्या मुर्ती ट्रस्टच्या सदस्यांनी काढून घेतल्या आहेत.
कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन हजार पोलीस, दंगलविरोधी पथक, राज्य राखीव दल तैनात करण्यात आले आहे. परिसरात मुख्य रस्त्यांवर वावरण्यास मनाई करून जमावबंदी घोषित करण्यात आली होती.
जेसीबी, पोकलेन आणि कामगार मंदिर परिसरात दोन दिवसांपूर्वी आणून ठेवण्यात आले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आणि प्रतिनिधींना नोटीसा बजावून मंदिर परिसरात येणास बंदी आहे. तसेच मंदिराविरोधात याचिका करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप ठाकूर यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.