मुंबई : अयोध्या दौऱ्यावरुन टीकेचा सामना करावा लागत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका आल्या की राम मंदिराचा विषय निघणारच आणि त्यामुळेच आपण हा मुद्दा हाती घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


"मी राम मंदिराचा विषय का घेतला? अयोध्येचा दौरा आम्ही करतोय म्हणून काही लोक आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना टीका करु द्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला, त्यामुळे आमच्यावर टीका होईल. मात्र निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा येणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


निवडणुकीच्या काळात भाजपला राम मंदिराची आठवण येते. निवडणूक झाल्यानंतर भाजप राम मंदिराची घोषणा विसरतो. अच्छे दिन जुमला होता, तसच राम मंदिराचा मुद्दाही जुमला आहे का? याचा सोक्षमोक्ष लागायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


टीव्हीजे या पत्रकार संघटनेच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी राम मंदिर मुद्द्यावर भाष्य केलं. याप्रसंगी संगीतकार अवधुत गुप्ते, अभिनेत्री स्पृहा जोशी उपस्थित होते.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. भाजप राम मंदिरासाठी आग्रही असताना शिवसेनेनंही हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा सध्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.