मुंबई : मुंबईतील एका मॉडेलला कास्टिंग काऊचसाठी जबरदस्ती करणाऱ्या व्यक्तीला भर रस्त्यात मार खाण्याची वेळ आली आहे. फिल्ममध्ये काम देण्याचं आमिष दाखवत अभिनेत्रीला या व्यक्तीने जबरदस्ती केली होती. मॉडेल असलेल्या अमन संधू या तरुणीनं जबरदस्ती करणाऱ्या दीपक मिश्राचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यानंतर तीनं दीपकला भररस्त्यात केवळ मारलंच नाही, तर त्याचा व्हिडीओ काढून फेसबुकवर शेअरही केला.
मुंबईच्या ओशिवारामध्ये हा सारा प्रकार आज घडला आहे. हा चंदेरी दुनियेच्या झगमगाटामागे दडलेल्या वास्तवाचा ट्रेलर आहे. मॉडेल्सना मोठी स्वप्न दाखवून, त्यांना कास्टिंग काऊचच्या गर्तेत ढकलणाऱ्या दीपक मिश्राला या प्रकरणाने मोठी अद्दल घडली आहे. बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत तारका बनण्याचं स्वप्न उऱाशी बाळगून अमन चंदीगडहून मुंबईत आली होती. तीला लहान-मोठ्या मालिकांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. पण काही दिवसांपूर्वी दीपक मिश्रा नावाच्या व्यक्तीचा अमनला फोन आला. दीपक मिश्रानं अमनला चित्रपटातील रोलच्या बदल्यात कॉम्प्रमाईज करायला सांगितलं.
कॉम्प्रमाईज शब्दामागे नेमका कोणता अर्थ दडलाय हे अमनला वेगळ्यानं सांगण्याची गरज भासली नाही. त्यामुळं दीपकला धडा शिकवण्यासाठी अमननं त्याला एका हॉटेलात बोलावलं. दीपक पळू लागताच अमननं त्याला पकडून चांगलाच चोप दिला. दीपक सारख्या दलालाच्या विळख्यात आणखी कोणी अडकू नये, म्हणून अमननं फेसबूकवर झाल्या घटनेचा व्हिडीओही शेअर केला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे