मुंबई : म्हाडाने 2014 पूर्वी दिलेली सर्व अपूर्ण कंत्राटं रद्द करणार, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. चार ते पाच वर्षात सुरु न केलेली कंत्राटं देखील रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत आदेश देण्यात आल्याचंही मेहतांनी सांगितलं.
म्हाडाचे प्रकल्प आणि संक्रमण शिबिरांच्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश असणार आहे. म्हाडाकडून बिल्डरांना देण्यात आलेली कामं वर्षानुवर्षे रेंगाळतात. याला चाप लावण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये प्रामुख्याने बी. जी. शिर्के यांना दिलेल्या कामांचा समावेश असणार आहे. अनेक वर्षे उलटूनही काम सुरु न करणाऱ्या बिल्डरांना या निर्णयाने मोठा धक्का बसणार आहे.