मुंबई : आयसिस या दहशतवादी संघटनेत मुंबईतला आणखी एक तरुण सहभागी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. माहिममधील घर सोडून गेलेला तरुण दोन महिने उलटल्यानंतरही परतलेला नाही.
सैय्यद अशरफ इरफान अहमद वय वर्षे 20 हा माहिमच्या वांजेवाडीत राहणारा तरुण 27 फेब्रुवारी रोजी घरातून बाहेर पडला. पण तो परत आलाच नाही. आपला मुलगा आयसिसमध्ये तर सामील झाला नाही ना? या शंकेने कुटुंबियांची झोप उडाली आहे.
अशरफ सोशल मीडियावर सक्रिय असायचा. सायबर कॅफेत जाऊन तासनतास इंटरनेटवर बसायचा. त्याच्या इंटरनेटचा, खाण्यापिण्याचा खर्च कोण करायचं, असा सवालही अशरफच्या भावाच्या मनात निर्माण झाला आहे.
आपल्या मुलाचा शोध घेणाऱ्याला कुटुंबियांनी बक्षीसही जारी केलं आहे. पण अजून कोणताही सुगावा लागलेला नाही. अशरफचे आई-वडिल रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत.
अशरफच्या बेपत्ता होण्याने एटीएस सतर्क झाली आहे. अशरफ जात असलेल्या सायबर कॅफेमध्येही त्यांनी चौकशी सुरु झाली आहे. अशरफ ज्या सायबर कॅफेमध्ये जात होता, त्या सायबर कॅफेची हार्ड डिस्कही एटीएसने ताब्यात घेतली आहे.
अशरफचा शोध घेताना आतापर्यंत काय हाती लागलं, याचा खुलासा अद्याप एटीएसने केलेला नाही. तर पोलिसांनीही अजून त्यांची बाजू मांडलेली नाही. एटीएसकडून अशरफच्या घरी जाऊन वारंवार चौकशी केली जात आहे.
सोशल मीडियाद्वारे आयसिस भारतात हातपाय पसरत असल्याचं स्पष्ट आहे. त्यासाठी संशयित तरुणांचे एटीएसकडून समुपदेशनही केलं जातं. पण त्यानंतरही काही तरुण आयसिसच्या जाळ्यात अडकतातच. त्यामुळे तरुणांची माथी भडकवणाऱ्या या जिहादींशी लढण्यासाठी फक्त यंत्रणेनेच नाही, तर लोकांनीही तयार राहण्याची गरज आहे.