मुंबई : येस बँकेच्या हजारो कोटी रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेला बँकेचा संस्थापक राणा कपूरच्या ईडी (अमंलबजावणा संचालनालय) कोठडीत सोमवारी पीएमएलए कोर्टानं 20 मार्चपर्यंत वाढ केली आहे. कपूरची रिमांड संपल्यानं सोमवारी दुपारी त्याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश पी. आर. राजवैद्य यांच्यापुढे हजर करण्यात आले. कपूरने त्याला अस्थमा आणि मानसिक नैराश्‍याचा आजार झाला असून उपचारांची गरज असल्याची विनंती कोर्टाकडे केली. माझे कुटुंबिय याबाबत काळजी घेतात, पण हे आजार कधीही बळावू शकतात असं त्यानं न्यायालयाला सांगितले आहे.



राणा कपूर बँकेचा सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप झालं होतं. यापैकी 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्यानं सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहिर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचाही सहभाग आहे. मात्र कपूर तपासामध्ये सहकार्य करीत नाही, असा दावा ईडीच्यावतीनं पुन्हा एकदा न्यायालयात करण्यात आला.


 राणा कपूर यांच्या कुटुंबियांच्या नावावर एकूण 78 कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे कागदावर दाखवण्यासाठी या 20 हजारांपैकी संबंधित कंपन्यांना कर्ज दिली गेली आहेत का?, याचा तपासणी करणं गरजेचं आहे. तपासयंत्रणेला शंका आहे की हा सारा पैसा याच कंपन्यात विखुरलेला असण्याची दाट शक्यता आहे.