भिवंडी :  कोरोना व्हायरस सध्या जगभर थैमान घालत आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून सर्वत्र भीतीचे वातावरण आबहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजागृती करून या व्हायरसपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो याबाबत जनजागृती भिवंडी शहरात सुरु आहे. अशातच भिवंडीत एका गरोदर महिलेने मास्क घालुन डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला. डोहाळे जेवणातील ओटी भरणाच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुणे मंडळी, महिलांना मास्कचे वितरण करून आगळा वेगळा संदेश समाजास देण्याचा प्रयत्न केला यातून केला गेला.


भिवंडी मीठपाडा येथील पूनम मोनीश गायकवाड या  महिलेने आपल्या पहिल्या गरोदरपणातील डोहाळं जेवण कार्यक्रमात मास्कचं वाटप केलं. सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीने लोकं घरबाहेर पडण्यास नकार देत आहेत. त्यात आपल्या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्या महिलांना करोनाबाबतची भीती जावी यासाठी हा प्रयत्न केला आहे.

पूनम गायकवाड यांनी नटून-सजून मेकअप केल्यावर प्रथम स्वतःच्या  चेहऱ्यावर मास्क लावला आणि नंतर कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांना मास्क दिला. तसेच त्यांना करोनाबाबत घाबरून न जात आपण काय काळजी घेतली पाहिजे या बाबतदेखील माहिती दिली. या आगळ्या वेगळ्या जनजागृतीतून  पूनम गायकवाड यांनी आपला कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहील असा साजरा केला.

दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.